हत्या की आत्महत्या ? यासह अनेक प्रश्न अनुत्तरित. पोलिसांनी केली तपासचक्रे गतिमान
हैदराबाद : कन्नड टीव्ही अभिनेत्री शोभिता शिवण्णा ही तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे तिच्या घरी ३० नोव्हेंबर रोजी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आली. गचीबोवली येथील श्रीराम नगर कॉलनीत २९ वर्षीय शोभिताचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.
शोभिता शिवण्णाचे पती सुधीर यांचे कोणतेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. लग्नानंतर ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीपासून दूर होती आणि पती सुधीरसोबत हैदराबादमध्ये राहत होती. शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस अपार्टमेंटमध्ये पोहोचले तेव्हा शोभिताचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान तिने आत्महत्या का केली ? ही आत्महत्या आहे की हत्या ? घटनेवेळी तिचा पती किंवा घरातील इतर सदस्य कुठे होते ? हे आणि इतर अनेक प्रश्नांची अजूनही उकल होऊ शलेली नाही. दरम्यान सध्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा ताबा घेतला असून तपास चक्रे गतिमान केली आहेत.
शोभिता 'ब्रह्मगंटू' आणि 'निनिदाले' या टेलिव्हिजन मालिकांमधील तिच्या सौज्वळ भूमिकांसाठी विशेष लोकप्रिय होती. तिने काही चित्रपटांमध्येही काम केले. कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या या गुणी अभिनेत्रीचे गेल्या वर्षी लग्न झाले होते.