फलक पाहण्यासाठी थांबलेल्या कारमुळे दोन धावत्या कारची टक्कर
फोंडा : खांडेपार येथील नवीन पुलाजवळील राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मध्यभागी अज्ञातानी लावलेला फलक सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे. रविवारी दुपारी फलक पाहण्यासाठी थांबलेल्या कारमुळे दोन धावत्या कारची टक्कर झाली. अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी थांबलेल्या कार मागे अपघात घडल्याचे पाहून कार चालकाने तेथून पळ काढला.
खांडेपार येथील पुलाजवळ रविवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास फोंडाहून मोलेच्या दिशेने धावणारी कार अचानक फलक पाहण्यासाठी रस्त्यावर थांबली. रस्त्यावर थांबलेल्या कारमुळे मागाहून त्याच दिशेने जाणारी गोव्यातील एका कार चालकाने ब्रेक लावून आपली कार थांबविली. पण गोवा दर्शन घेऊन माघारी कर्नाटक राज्यात सुसाट वेगाने धावणाऱ्या केए-०४-एनसी-८०९२ क्रमांकाच्या अलिशान कारची धडक गोव्यातील कारच्या मागे धडकली. त्यावेळी गोव्यातील कार दुभाजकावर चढली. चालक सतर्क राहिल्याने कार सुखरूप दुभाजकावर उभी राहिली. पण, राष्ट्रीय महामार्गावर व सर्व्हिस रोडच्या मध्यभागी लावलेला फलक पाहण्यासाठी थांबलेल्या कार चालकाने आपल्या मागे अपघात घडल्याचे पाहून तेथून पळ काढला. अपघातात सापडलेल्या दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.
राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मध्यभागी दोन दिवसांपूर्वी अज्ञातानी एक फलक लावला आहे. अज्ञाताचा वाहन चालकांना रस्त्याची दिशा दाखविण्याचा फलक लावणे हा उद्देश होता. पण, फलक रस्त्यावर ठेवल्याने वाहन चालकांना रस्त्यावर वाहने पार्क करून फलकावरील दिशा पाहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे परिसरात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात रोखण्यासाठी बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने आवश्यक असलेला फलक लावण्याची मागणी वाहनचालक करीत आहे.