
म्हापसा : पर्रा येथील भलत्याचीच ८५० चौ. मी. जमिन परस्पररित्या विकून मेसर्स पी.के.एस. ईस्टेट या दिल्ली स्थित कंपनीला ८५ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी ८ जणांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. बार्देश मामलेदार कार्यालयातील म्यूटेशन प्रक्रियेवेळी जमिनीच्या मूळ मालकाने हरकत घेतल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
एलिझाबेथ आबेलिना मास्कारेन्हस (रा. गौरावाडा कळंगुट), जॉयसी फेलिक्स डिसिल्वा (माझगाव मुंबई), ग्रेनविले जॉन डिसा (रा. अमेरीका), जॉन रोमीओ डिसा ( रा. तेलंगणा), ब्लोझम मौद कॅशीन (दुबई), जॉन फ्रान्सिस मिनेझिस (रा. आंबोली मुंबई), क्लिफ्फोर्ड व्हिएगस व अनिता व्हिएगस (दोघेही रा. करंजाळे पणजी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी मेसर्स पी.के.एस. ईस्टेटचे अधिकृत अधिकारी आकाश मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा जमीन विक्री व्यवहार १४ डिसेंबर २०२३ रोजी झाला होता.
संशयितांनी पर्रा गावातील सर्वे क्रमांक ३५५ (३१/ ५) मधील ८५० चौरस मीटर जमीन आपल्या मालकीची असल्याचे फिर्यादींना भासवले आणि सदर जमीन विकत घेण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार आकाश मिश्रा यांनी आपल्या कंपनीच्या मार्फत ८५ लाख रुपये रक्कम देऊन ही जमीन खरेदी केली. तसेच बार्देश उपनिबंधक कार्यालयाच्या मार्फत संशयितांनी जमिनीचे विक्रीपत्र करून पी.के.एस इस्टेट यांच्या नावावर जमीन हस्तांतरित केली.
हल्लीच जमिनीचे म्युटेशन करण्यासाठी फिर्यादींनी फाईल बार्देश मामलेदार कार्यालयात सादर केली होती. या प्रक्रियेवेळी जमिनीच्या मूळ मालकांनी म्यूटेशनास हरकत घेतली व जमिनीवर आपला दावा केला. सदर जमिनीचे मूळ वारसदार हे हरकत घेतलेली व्यक्ती असल्याचे आढळून आले.
त्यानंतर वरील संशयितांनी आपली फसवणूक करून ८५ लाख रूपये उकळल्याचे आकाश मिश्रा यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी गुरूवारी २८ रोजी म्हापसा पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संशयितांविरूध्द भा.दं.सं.च्या १२० ब, २०७, ४१७, ४२० व ३४ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी करत आहेत.