बैठकीत सरपंच, पंच सदस्य व स्थानिक लोकांचे समर्थन
धारगळ येथील बैठकीत सनबर्नला पाठिंबा देताना स्थानिक.
पेडणे : एका बाजूने सनबर्न महोत्सवाला पाठिंबा तर दुसऱ्या गटाकडून विरोध, मात्र सत्तारूढ धारगळ पंचायतीची या महोत्सवाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सभेत उपस्थिती लावून जाहीर केले. धारगळ येथे होणाऱ्या इंडियन सनबर्नला रविवारी धारगळ पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य व स्थानिक लोकांनी समर्थन दिले.
धारगळ पंचायत कार्यालय समोर व त्याच धारगळ पंचायत क्षेत्रात रविवारी सनबर्नविषयी दोन बैठका घेण्यात आल्या. यात सरपंच, पंच व स्थानिक लोकांनी समर्थन करत गावात आर्थिक बाजू तसेच एक मनोरंजन कार्यक्रम होणार आणि स्थानिक लोकांना रोजगार संधी मिळेल, असे सांगितले.
काही राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी लोकांना जमवून सनबर्नला विरोध करतात. मात्र याला धारगळ वासियांचा विरोध नाही. आज धारगळसारख्या गावात सनबर्न आल्यावर स्थानिकांना किंवा गावाला जर काही मदत होत असेल तर त्याला विरोध का? संस्कृतिच्या नावाने हे राजकीय आपली पोळी भाजून घेण्यासाठी बाहेरील लोकांना घेऊन विरोध करतात. धारगळ येथे कितीतरी प्रकल्प आले, त्याला आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विरोध का केला नाही. येथील सिमेंट प्रकल्प बंद करणार असे बोलणाऱ्यांनी अद्याप हा प्रकल्प का बंद केला नाही, असा सवाल नागरिकांनी केला. यावेळी उपस्थितांनी या महोत्सवाला हात उंचावून पाठिंबा दर्शवला.
जर लोकांना सनबर्न महोत्सव हवा असेल आणि त्यामुळे गावाचे भले होणार असेल तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नसेल तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ. _ सतीश धुमाळ, सरपंच, धारगळ