हणजूण वाहतूक विभागाच्या तीन पोलिसांची तडकाफडकी बदली

वाहतूक शिक्षण सेलमध्ये हजेरी लावण्याचे निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November, 09:34 am
हणजूण वाहतूक विभागाच्या तीन पोलिसांची तडकाफडकी बदली

म्हापसा : हणजूण वाहतूक पोलीस विभागाच्या तिघा पोलिसांची तडाफडकी पणजीतील वाहतूक शिक्षण सेलमध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचा वायरलेस आदेश वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी शुक्रवार, दि. २९ रोजी जारी केला आहे. गेल्या मार्चमध्येही याच पोलीस विभागाच्या ११ पोलिसांची बदली करण्यात आली होती.
बदली केलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन चोपडेकर, हवालदार गोविंद मांद्रेकर व कॉ. प्रशांत शेटये यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये पर्यटकांकडून पैसे उकळण्याचा कथित आरोप या तिघाही पोलिसांवर आहे. याप्रकरणी व्हिडीओ फुटेजसह संबंधित पर्यटकांनी वाहतूक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. प्राथमिक चौकशीअंती अधीक्षकांनी बदलीचा आदेश जारी करीत तत्काळ वाहतूक शिक्षण सेलमध्ये हजेरी लावण्याचे निर्देशही दिला आहे.

शुक्रवारी वाहतुक पोलीस अधीक्षकांनी वरील तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण केले व त्यांची चौकशी केली आणि नंतर लगेच संध्याकाळी संबंधितांच्या बदलीचा आदेश जारी केला. या पोलिसांच्या तडाफडकी बदलीनंतर पर्यटकांना लक्ष्य बनविण्याच्या हणजूण वाहतुक पोलीस स्थानकाच्या कारभाराचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

दरम्यान, हणजूणमध्ये वाहतुक पोलीसच खासगी गाड्यांना भाडेमारी करण्यासाठी प्रोत्साहन देतात, अशा तक्रारी वारंवार रेन्ट अ बाईक व रेन्ट अ कॅब व्यवसायिक करीत आहेत. त्यामुळे या अगोदर हणजूण वाहतुक पोलिसांच्या कार्यपध्दतीवर आमदार डिलायला लोबो व मायकल लोबो यांनी प्रश्न उपस्थित केले होते. वाहन वाहतुक नियमांच्या नावाखाली या पोलिसांकडून फक्त पर्यटकांचीच छळणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

दरम्यान, वाहनचालक पर्यटकांशी गैरवर्तणूक करण्याचे अनेक प्रकार या बदली झालेल्या पोलिसांकडून घडलेले आहेत. अशी बरीच प्रकरणे हणजूण पोलीस स्थानका पर्यंत पोचली होती. त्यानंतर वाहतुक पोलीस अधिकाऱ्यांनी ही प्रकरणे पर्यटकांकडे सामंजस्याने मिटवली होती.             

हेही वाचा