हुनान : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा चीनमध्ये सापडला आहे. हुनान प्रांतात सापडलेल्या या साठ्यातून एक हजार टनांहून अधिक सोने काढले जाईल, असा अंदाज आहे. ही खाण जमिनीपासून तीन किलोमीटर खाली सापडली. एवढा मोठा सोन्याचा साठा असल्याने चीनची अर्थव्यवस्था तर मजबूत होईलच शिवाय देशांतर्गत मागणी पूर्ण होण्यासही मदत होईल असा आशावाद येथील अर्थतज्ञांनी वर्तवला आहे.
हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने सोन्याचे साठे शोधले आहेत. सोन्याची ही खाण पिंगजियांग काउंटीमध्ये आहे, येथे भूगर्भशास्त्रज्ञांनी जमिनीच्या सुमारे तीन किलोमीटर खोलवर ४० सोन्याच्या स्ट्रीम चिन्हांकित केल्या आहेत. तीन किलोमीटर खोलीवर एक हजार टनांहून अधिक सोने असल्याचा अंदाज आहे. त्याची किंमत अंदाजे ८३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. कदाचित आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. ही खाण दक्षिण आफ्रिकेत असलेल्या खाणीपेक्षा मोठी आहे. येथे सुमारे ८०० टन सोन्याचा साठा आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे. २०२३ मध्ये जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनात चीनचा वाटा दहा टक्के होता. या वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत चीनने ७४१ टन सोन्याचा वापर केला, तर उत्पादन २६८ टन होते. याचा अर्थ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते.
चीनच्या हुनान प्रांतापूर्वी, जगातील सर्वात मोठा साठा दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, रशिया, पापुआ न्यू गिनी, चिली, युनायटेड स्टेट्स, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि डोमिनिकन रिपब्लिक यासह अनेक देशांमध्ये पसरलेल्या खाणींमध्ये होता. साऊथ डीप गोल्ड माइन, ग्रासबर्ग गोल्ड माईन आणि ऑलिम्पियाडा गोल्ड माईन या खाणी सोन्याच्या उत्पादनात आणि साठेबाजीत अग्रेसर आहेत.
भारतातील सर्वाधिक सोन्याचा साठा कर्नाटकात आहे. येथे कोलार एहुटी आणि उटी येथील खाणींमधुन मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन केले जाते. यापैकी कोलार येथीळ सोन्याच्या खाणी सर्वात प्रसिद्ध आहेत. या सोन्याच्या खाणीवर एक चित्रपटही बनला आहे, जो खूप यशस्वी झाला होता. कोलार गोल्ड फील्ड २००१ मध्ये बंद करण्यात आले. १२० वर्षांच्या इतिहासात या खाणीतून ८०० टनांहून अधिक सोने काढण्यात आले.
गेल्या काही तिमाहीपासून जगभरातील देश सोन्याचा साठा वाढवत आहेत. यामध्ये भारत आणि चीनचाही समावेश आहे. सप्टेंबरअखेर आरबीआयकडे ८५५ टन सोन्याचा साठा होता. याचे कारण वाढता भू-राजकीय तणाव आहे, यामुळे जगभरातील देशांना डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करायचे आहे. त्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सोने, कारण ती सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. हे महागाईविरूद्ध एक प्रभावी शस्त्र म्हणून देखील काम करते.