दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर
पणजी : कर्मचारी भरती आयोगाला एलडीसी आणि स्टेनोग्राफरच्या २८५ पदांसाठी २,५०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आयोगाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर आहे. आयोगाकडे ऑनलाईन अर्ज येणे सुरू आहे.
आयोगामार्फत १९२५ पदे भरण्यासाठी जाहिरात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने जाहिराती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. २८५ पदांसाठीची जाहिरात ही १९२५ पदांपैकी एक आहे. त्यापैकी २३२ एलडीसी आणि ५३ स्टेनोग्राफरसाठी आहेत. २१ नोव्हेंबरला जाहिरात देण्यात आली होती.
अर्ज भरण्यास अजून बरेच दिवस बाकी आहेत. परीक्षापद्धती तसेच अभ्यासक्रमासह जाहिरातही आयोगाने जारी केली आहे. एलडीसी आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर पदासाठी प्रत्येकी ६० गुणांचे सीबीटी-२ आणि सीबीटी-३ असे दोन पेपर असतील. प्रत्येक पेपरसाठी वेळ मर्यादा ७५ मिनिटे असेल.
एलडीसीसाठी इंग्रजीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीसह संगणक साक्षरता आवश्यक आहे. ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी शॉर्ट हँडसाठी १०० शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगसाठी ३५ शब्द प्रति मिनिट असा वेग आवश्यक आहे.
एलडीसीची पदे अदिवासी कल्याण २, प्रोसिक्यूशन २, कौशल्य विकास ३, परिवहन २, कारागृह निरीक्षक ९, पुराभिलेख १, वजन माप १, उच्च शिक्षण संचालनालय १०, दंत महाविद्यालय २, ग्रामविकास २, शिक्षण १६, माहिती व प्रसिद्धी ६, तंत्रशिक्षण २१, मुद्रण व छपाई २, जमीन सर्वेक्षण २२, कृषी ७, वीज १४, जिल्हाधिकारी (दक्षिण) १५, मुख्य निवडणूक अधिकारी ३, कारखाने आणि बाष्पक ३, पर्यटन ७, राज्य नोंदणी आणि नोटरी सेवा ३, व्यवसाय कर ५, दक्षता १२, पर्यावरण आणि हवामान बदल १, नियोजन आणि सांख्यिकी १६, पोलीस १७, सहकार ७, औद्योगिक आणि वाणिज्य ४, सार्वजनिक तक्रारी ३, माहिती तंत्रज्ञान ३, नागरी पुरवठा १, क्रीडा व युवक व्यवहार ५, तर ५ लेखा संचालनालय खात्यात जागा भरणे आहे.
ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठीच्या ५३ जागांं पैकी ३१ जागा सर्वसामान्य गटासाठी आहेत. एसटीसाठी ९, एससीसाठी ०, ओबीसीसाठी ९ तर इडब्ल्यूएससाठी ४ जागा राखीव आहेत. गोवा सदनमधील १ जागा सर्वसामान्य गटासाठी आहे.