गोवा। अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात गोवा देशात अव्वल स्थानावर

मदतनीसांच्या सर्वाधिक मानधनात केरळनंतर गोव्याचा क्रमांक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November, 11:34 pm
गोवा। अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात गोवा देशात अव्वल स्थानावर

पणजी : अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात गोवा देशात अव्वलस्थानी आहे. मदतनीसांना मानधन देण्यात केरळ राज्य आघाडीवर असून, गोवा दुसऱ्या स्थानी आहे. गोव्यात अंगणवाडी सेविकांना जितके मानधन मिळते, तितके अन्य कोणत्याही राज्यात मिळत नसल्याचे महिला आणि कल्याण मंत्रालयाच्या अहवालातून उघड झाले आहे.

१० वर्षांपर्यंत अनुभव असलेल्या सेविकांना ५,५०० रुपये, १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्यांना ६ हजार रुपये, १५ ते २० वर्षांचा अनुभव असलेल्यांना ८ हजार रुपये आणि २० ते २५ वर्षांचा अनुभव असलेल्या सेविकांना महिन्याला १० हजार रुपये मानधन मिळते. मदतनीसांच्या मानधनात केरळ प्रथमस्थानी, तर गोवा दुसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये ५ वर्षे अनुभव असलेल्या मदतनीसांना ६,२५० आ​णि १० किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्यांना ६,७५० रुपये इतके मानधन देण्यात येते. तर, गोव्यात २५ किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या मदतनीसांना ६ हजार रुपये मानधन दिले जाते. याशिवाय ५ वर्षांपर्यंत अनुभव असलेल्या मदतनीसांना ३ हजार, ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्यांना ३,५००, १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्यांना ४ हजार रुपये, १५ ते २० वर्षांचा अनुभव असलेल्या मदतनीसांना ४,५००, तर, २० ते २५ वर्षांचा अनुभव असलेल्या मदतनीसांना ५,२५० रुपये मानधन दिले जाते.

देशातील ३६ राज्यांची माहिती समोर

देशातील ३६ राज्ये आपापल्या राज्यात कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना किती मानधन देते, याची यादी मंत्रालयाने अहवालातून जारी केली आहे. त्यानुसार गोव्यात २५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्या सेविकांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला १२ हजार रुपये मानधन मिळते. 

हेही वाचा