२०२३-२४ वर्षात मिळाले ४ हजार कोटी रुपये
पणजी : मागच्या तीन वर्षांत केंद्रातून राज्याला मिळणाऱ्या निधीत दुपटीने वाढ झाली आहे. राज्यात ६ खात्यांतून केंद्राकडून निधी मिळत होता. २०२१-२२मध्ये राज्याला २ हजार कोटी रुपये मिळाले होते तर आता २०२३-२४मध्ये हा आकडा ४ हजार कोटींवर पोहोचला आहे. मागच्या तीन वर्षांत राज्याला एकूण ११,१०३ कोटी एवढा निधी केंद्राकडून मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार, राज्याला अर्थ खाते, केंद्र पुरस्कृत योजना, केंद्राच्या स्वतंत्र योजना, बाह्य अनुदानीत प्रकल्पांसाठी मदत, विशेष मदत, भांडवली गुंतवणूक तसेच खर्चासाठी राज्याला विशेष मदत योजनेखाली २०२१-२२मध्ये २,४७८ कोटी, २०२२-२३मध्ये ३,८८५ कोटी तर २०२३-२४मध्ये ४,७४० कोटी एवढा निधी प्राप्त झाला.
अर्थ खात्याकडून मिळणाऱ्या निधीत लक्षणीय घट झाली आहे. मागच्या तीन वर्षांत अर्थ खात्याकडून राज्याला १८४ कोटी रुपये मिळाले आहेत. यापैकी २०२१-२२ वर्षात ११९ कोटी रुपये आले होते तर २०२२-२३ वर्षांत हा आकडा ५४.२० कोटीपर्यंत कमी झाला तर २०२३-२४ वर्षांत हा आकडा आणखी कमी होऊन १०.८० कोटीपर्यंत कमी झाला.