गोवा। ‘एनईबीपी’अंतर्गत राज्याला १५३ इलेक्ट्रिक बसेस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December, 11:55 pm
गोवा। ‘एनईबीपी’अंतर्गत राज्याला १५३ इलेक्ट्रिक बसेस

पणजी : राष्ट्रीय इलेक्ट्रिक बस कार्यक्रमाअंतर्गत (एनईबीपी) केंद्राने गोव्याला आतापर्यंत १५३ इलेक्ट्रिक बसेस पुरवल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

वाहनांमुळे वाढत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी ‘एनईबीपी’ कार्यक्रमाअंतर्गत देशातील सर्वच राज्यांना इलेक्ट्रिक आणि हायब्रिड इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने घेतलेला होता. त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत सर्वच रा​ज्यांना इलेक्ट्रिक बसेसही देण्यास सुरुवात केली. त्यानुसार गोव्याला आतापर्यंत १५३ बसेस मिळाल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

‘एनईबीपी’ कार्यक्रमाअंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आतापर्यंत ३० राज्यांना १०,६७७ इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या आहेत. त्यात १०,१९० इलेक्ट्रिक आणि ४८७ हायब्रिड इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. सर्वाधिक २,५४३ इलेक्ट्रीक बसेस दिल्लीला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर २,४४८ बसेस महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या आहेत. तर, सर्वाधिक हायब्रिड इलेक्ट्रिक बसेस कर्नाटकला देण्यात आलेल्या आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्यापासून त्यांचा प्रवाशांना मोठा फायदा मिळत आहे. सोबतच प्रदूषण कमी होण्यासही मदत मिळाली आहे.

हेही वाचा