भाडे भरा; अन्यथा गाळे खाली करा !

महानगरपालिकेकडून पणजी मार्केटातील सुमारे ४०० व्यापाऱ्यांना नोटिसा


02nd December, 11:39 pm
भाडे भरा; अन्यथा गाळे खाली करा !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अनेक वर्षांपासून गाळ्यांचे भाडे न भरलेल्या पणजी मार्केटमधील सुमारे ४०० व्यापाऱ्यांना महापालिकेने (मनपा) नोटिसा जारी करत प्रलंबित भाडे सात दिवसांत भरण्याचे आणि न भरल्यास गाळे खाली करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे भाडे न भरणाऱ्यांवर मनपा खरेच कारवाई करणार की​ दरवेळीप्रमाणे यावेळीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार, याकडे स्थानिकांच्या नजरा लागून आहेत.
गोव्यासह विविध राज्यांतून गोव्यात येऊन स्थायिक झालेल्या अनेक व्यापाऱ्यांनी पणजी मार्केटमध्ये गाळे घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातील सुमारे ४०० जणांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून गाळ्यांचे भाडे भरलेले नाही. थकलेला रकमेचा आकडा कोटींच्या घरात आहे. व्यापाऱ्यांकडून भाडे मिळत नसल्याचा मोठा फटका मनपाला बसत आहे. त्यामुळे आता आयुक्त क्लेन मदारिया यांनी अनेक वर्षांपासून भाडे प्रलंबित असलेल्या सुमारे ४०० जणांना नोटिसा जारी करत, सात दिवसांत भाडे भरण्याचे निर्देश दिले आहेत. जे व्यापारी भाडे भरणार नाहीत, त्यांना तत्काळ गाळे खाली करावे लागतील, असेही त्यांनी नोटिसांत म्हटले आहे.
माजी महापौर उदय मडकईकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून भाडे वसूल करून त्यांच्याशी करार करण्याची प्रक्रिया पुढे नेली होती. याबाबत व्यापारी आणि मनपा प्रशासनात वारंवार बैठकाही झाल्या होत्या. या प्रक्रियेस नंतर खीळ बसली. मनपा दरवर्षी अनेक वर्षांपासून भाडे प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांना नोटिसा काढते; परंतु भाडे न भरणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. या विषयावरून मनपा बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत अनेकदा शाब्दिक द्वंद्वही पेटले आहे.
दीर्घकालीन करारास व्यापाऱ्यांचा विरोध
पणजी मनपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांशी कमी कालावधीसाठी करार करायचा आहे; परंतु बहुतांशी व्यापाऱ्यांना मनपाचा हा निर्णय मान्य नाही. त्यांना दीर्घकाळासाठी करार हवा आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून वेळेत भाडे भरले जात नाही, अशी माहिती मनपातील सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.              

हेही वाचा