पणजी : प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत राज्यातील ३.१० लाख लोकांनी विमा घेतला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख आशिष मालविय यांनी दिली. बुधवारी स्टार युनियन दायइचीतर्फे आयोजित प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेच्या जागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे विवेश दाधीच, गुरुविंदर सिंग व अन्य अधिकारीही उपस्थित होते.
जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक केवळ ४३६ रुपये भरावे लागतात. यामध्ये एका व्यक्तीचा २ लाख रुपये विमा उतरवला जातो. सर्वसामान्य व्यक्तींना किफायतशीर दरात उपलब्ध असणारा हा एकमेव विमा आहे. विम्याच्या कागदपत्रांवर देखील सहजपणे प्रक्रिया केली जाते. विम्याची रक्कम मिळवण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. मालविय यांनी सांगितले. राज्यातील सर्व लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, जागृती अभियाना अंतर्गत दोन्ही जिल्ह्यात ५० ठिकाणी विमा रथ फिरणार आहे. आम्ही लोकांना या योजनेचे फायदे पटवून देत त्यांची नोंदणी करणार आहोत. १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे. योजनेनुसार विम्याचा प्रीमियम ३१ मे रोजी भरावा लागणार तर विमा कव्हर १ जून ते ३१ मे पर्यंत असणार आहे. या योजनेअंतर्गत विम्याचे दावे निकाली काढण्याचे प्रमाण देखील अधिक आहे, अशी माहिती गुरूविंदर सिंग यांनी दिली.