गुजरातमधून एकाला अटक : संशयिताने आमदाराकडून उकळले पाच लाख रुपये
पणजी : गोव्यातील विद्यमान आमदाराचा एका महिलेबरोबर माॅर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनाम करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी गुन्हा शाखेने कुकेश राऊता (२५, रा. ओडिसा) या संशयिताला गुजरातमधून अटक केली. संशयिताने आतापर्यंत संबंधित आमदाराकडून पाच लाख रुपये खंडणी उकळली.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संबंधित आमदाराने गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित कुकेश राऊता (२५, रा. ओडिसा) याने ५ डिसेंबर २०२३ पूर्वी आमदाराला व्हिडिओ काॅल करून संपर्क केला. त्यावेळी संशयिताने आमदाराचा व्हिडिओ काॅल रेकॉर्ड केला. त्यानंतर संशयिताने आमदाराचा एका महिलेबरोबर माॅर्फ करून अश्लील व्हिडिओ तयार केला. तो माॅर्फ व्हिडिओ आमदाराच्या मोबाईलवर पाठवून सोशल मीडियावर अपलोड करून बदनाम करण्याची धमकी दिली. संशयिताने आमदाराकडून प्रथम ५५ हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयिताने धमकी देत आमदाराकडे ५ कोटीची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याची दखल घेऊन गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी २ डिसेंबर रोजी संशयित कुकेश राऊता या युवकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६सी, ६७ व ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संशयित गुजरात येथील अहमदाबाद येथे असल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर रामानन आणि कॉ. सैफुला मकंदर हे पथक मंगळवारी पहाटे रवाना करण्यात आले. तिथे पोहचल्यानंतर पथकाने संशयित कुकेश राऊता याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी त्याला गोव्यात आणून अटक केली.
कुंडईतील कंपनीत संशयित कामाला
संशयित युवकाची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने अनेकदा धमकी देत आमदाराकडून आतापर्यंत पाच लाख रुपये खंडणी उकळल्याची माहिती दिली. तसेच तो विज्ञान शाखेचा पोस्ट ग्रॅज्युएट असून कुंडईतील एका प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनीत कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.