मडगाव पोलिसांनी पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कोंब मडगाव येथे वितळवलेल्या सोन्याचे दागिने करणार्या तिघा कारागिरांनी ७२ लाखांचे ९५९ ग्रॅम सोने घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी मडगाव पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले होते. त्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना मडगाव स्थानकात आणण्यात आले.
कारागिरांनीच सोन्याची चोरी करत पसार झाल्याची तक्रार मडगाव येथील प्रीतेश लोटलीकर यांनी पोलिसांत केली होती. सुप्रोकाश मोंडल (२९, रा. मिनाखाण, पश्चिम बंगाल), संजोय मोंडल (२२, रा. महाराजपूर, पश्चिम बंगाल) व तापस जना (४४, रा. महाराजपूर, नारायणपूर, प. बंगाल) हे लोटलीकर यांच्याकडे वितळवलेल्या सोन्यापासून दागिने तयार करण्याचे काम करत होते. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ पासून ३० नोव्हेंबर सकाळपर्यंतच्या कालावधीत या कारागिरांनी सोन्याचे दागिने करण्यासाठी दिलेले ९५९ ग्रॅम सोने घेऊन पळ काढला. या सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे ७२ लाख रुपये आहे. सुवर्णकाराने कारागिरांवर विश्वास ठेवला व त्याच कारागिरांनी मालकाचा विश्वासघात करत सोने घेऊन पळ काढला.
याप्रकरणी मडगाव पोलिसांनी तिन्ही संशयितांवर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. मडगाव पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करत होते. पोलिसांनी या चोरीच्या शोधासाठी एक पथक तयार करून पश्चिम बंगाल येथे कारागिरांच्या मूळ गावी तपासासाठी पाठवले होते. त्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली.