आमदार प्रवीण आर्लेकर : मतदारसंघातील सरपंच, पंच, नागरिकांच्या बैठकीत इशारा
आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : ‘सनबर्न’ महोत्सवाला माझा विरोध नाही; परंतु त्याचे आयोजन धारगळ पंचायत क्षेत्रात मुळीच करू नये. तरीही आयोजन केले, तर काय होईल ते त्याच दिवशी दिसून येईल, असा इशारा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिला.
पेडणे मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, धारगळचे पंच भूषण नाईक, माजी सरपंच अनिकेत साळगावकर, मोपाचे सरपंच सुबोध महाले, तोरसेच्या सरपंच छाया शेट्ये, नगरसेविका अश्विनी पालयेकर, तृप्ती सावळ पोरस्कडेच्या सरपंच दीप्ती हळदणकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार आर्लेकर पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत सनबर्न आयोजनाबाबत सर्वांची मते जाणून घेतली. ‘सनबर्न’ पेडणे मतदारसंघात नकोच. आम्ही त्याला थारा देणार नाही. आम्ही आमच्या आमदारांसोबत आहोत. सनबर्नला विरोध करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊ, असे उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले.
प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ !
धारगळचे पंच भूषण उर्फ प्रदीप नाईक म्हणाले की, धारगळ पंचायतीने परवानगी दिली असली तरी सनबर्न महोत्सव धारगळवासीयांना नको आहे. केवळ पाच पंचांनी परवाना दिला म्हणून सनबर्न धारगळमध्ये आयोजित करू नये. महोत्सवाविरोधात प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही आमची तयारी आहे.