मांद्रे पंचावर हल्ला; राजकारण तापले

महेश कोनाडकरांवर तुये हॉस्पिटलमध्ये उपचार : हल्लेखोरांना २४ तासांत अटक करण्याची लोबो, सोपटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


7 hours ago
मांद्रे पंचावर हल्ला; राजकारण तापले

पत्रकारांशी बोलताना आमदार मायकल लोबो. सोबत माजी आमदार दयानंद सोपटे व इतर. (निवृत्ती शिरोडकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे/पणजी : मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी सकाळी आस्कावाडा मांद्रे येथील त्यांच्या घरानजीकच कारमधून आलेल्या पाच बुरखाधारी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी सळ्यांनी कोनाडकरांना मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेल्या कोनाडकरांवर तुये येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर पेडणे मतदारसंघातील राजकारण तापले आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासह अनेकांना कोनाडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. सायंकाळी लोबो, सोपटेंसह काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हल्लेखोरांना २४ तासांत अटक करण्याची मागणी केली.


सप्ताहाच्या निमित्ताने आमदार मायकल लोबो मांद्रे येथे आले होते. तेव्हा त्यांनी महेश कोनाडकर यांच्यासोबत चहा घेतला होता. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोबो यांनी मांद्रेतून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. लोबोंसोबत असल्याचा राग धरूनच कोनाडकर यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कोनाडकरांना तातडीने तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे आमदार मायकल लोबो, दयानंद सोपटे व इतरांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली. तेव्हा बुरखाधारी हल्लेखोर मारहाण करताना ‘तुका मायकल जाय...’, असे म्हणत होते, असे कोनाडकरांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. कोनाडकरांना अधिक उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे.
गुंडगिरी खपवून घेणार नाही : दयानंद सोपटे
मी यापूर्वी मांद्रे व पेडण्याचा आमदार राहिलो आहे. मांद्रे मतदारसंघात यापूर्वी इतर भागातील बरेच जण आमदार झाले आहेत. ‘तुका मायकल जाय...’ असे विचारत पंचाला मारहाण करणे गंभीर आहे. जनता असली गुंडगिरी खपवून घेणार नाही. २४ तासांच्या आत हल्लेखोराना अटक झाली नाही तर आम्ही पुढील कृती करणार आहोत, असे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.
विविध कामानिमित्त मांद्रेतील लोक संपर्कात : लोबो
माझे नाव घेऊन पंचाला झालेली मारहाण सहन करणार नाही. पंच कोनाडकर व ग्रामस्थांना माझा कायम पाठिंबा असेल. विधानसभा निवडणुकीला बराच कालावधी आहे. निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतला नसला तरी या मारहाणीचा निषेध करतो. हल्लेखोरांना अटक करून निष्पक्ष चौकशीचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला दिले आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
मारहाणीत आमदार जीत आरोलकरांचा हात
मांद्रेचे पंच महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात स्थानिक आमदार जीत आरोलकर यांचा हात आहे, असा थेट आरोप पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई यांनी केला.
मांद्रेच्या निरीक्षकांची तडकाफडकी बदली
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मांद्रे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शरीफ जॅकीस यांची उत्तर गोवा राखीव विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली. मोपाचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्याकडे मांद्रे पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.