राज्यसभा खासदार तानावडेंच्या प्रश्नाला मंत्री गडकरींचे उत्तर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यात ३,६१९ कोटी रुपये खर्चून १९९.९१ किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत. या निधीतून राज्यातील ६५ रस्ते प्रकल्प या पाच वर्षांत पूर्ण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
गोव्यातील रस्ते प्रकल्पांसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या पाच वर्षांमध्ये ४,०३९ कोटींचा निधी मंजूर केला होता; परंतु काही प्रकल्प जमीन संपादनासह इतर काही कारणांमुळे प्रलंबित राहिले आहेत. त्यातील जे ६५ प्रकल्प पूर्ण करण्यात आले, त्यांवर पाच वर्षांत ३,६१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात पायाभूत साधनसुविधा उभारण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले. गोव्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा विचार करून त्यांनी पाच वर्षांत गोव्यातील रस्त्यांवर ३,६१९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
बँकांकडून होणाऱ्या कर्जपुरवठ्याकडे वेधले लक्ष
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी राज्यसभेत शून्य प्रहराला गोव्यातील छोटे व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांसमोर बँकांकडून उभ्या राहत असलेल्या समस्यांवर प्रकाश टाकला. गोव्यातील बँकांकडून व्यावसायिकांना होणारा कर्जपुरवठा कमी आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जे देण्यातही बँका मागे आहे. गोव्यातील बँकांनी पतधोरणे बदलून छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणीही त्यांनी केली.