लीज कराराशिवाय मनपाला थकित भाडे मिळणे अशक्यच!

व्यापाऱ्यांची मागणी मान्य करण्याबाबत टेनंट असोसिएशनचे पत्र

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
लीज कराराशिवाय मनपाला थकित भाडे मिळणे अशक्यच!

पणजी : पणजी महानगरपालिका (मनपा) मार्केटमधील व्यापाऱ्यांशी लिव्ह अँड लायसन्स करार करण्यास तयार आहे. परंतु, हा करार घातक असल्यामुळेच व्यापाऱ्यांनी लीज कराराची मागणी केलेली आहे. मनपाने लीज करार केल्यास सर्वच व्यापारी थकित भाडे फेडतील, असे मार्केट टेनंट असोसिएशनचे उपाध्यक्ष धर्मेंद्र भगत यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
जुन्या मार्केटमधील व्यापाऱ्यांना २००३ मध्ये नव्या इमारतीत आणताना पूर्णपणे गोंधळ झालेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांची नावे नव्हती, अशांनाही इमारतीत गाळे देण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी व्यापाऱ्यांशी करार केलेले होते. त्यानंतर २०१३ मध्ये मनपाने व्यापाऱ्यांशी लिव्ह अँड लायसन्स करार करण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु, या कराराला व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच आक्षेप घेतलेला आहे. हा करार केवळ अकरा महिन्यांसाठी​ असल्याने व्यापाऱ्यांना तो घातक वाटत आहे. त्याबदल्यात मनपाने सुरुवातीला ३३ वर्षांचा लीज करार करावा आणि दर ३३ वर्षांनी तीनवेळा मुदतवाढ द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे भगत म्हणाले. मनपाने व्यापाऱ्यांची ही मागणी मान्य केल्यास सर्वच व्यापारी थकित भाडे भरतील, असेही त्यांनी नमूद केले.


व्यापाऱ्यांकडून दहा कोटींचे भाडे थकित               

गाळ्यांचे थकित भाडे भरण्यासंदर्भात पणजी महानगरपालिकेने (मनपा) काहीच दिवसांपूर्वी चारशे व्यापाऱ्यांना नोटिसा जारी केल्या होत्या. त्यांच्याकडून सुमारे दहा कोटींचे भाडे थकित आहे. दरवर्षी मनपा व्यापाऱ्यांना भाडे वसुलीसाठी नोटिसा पाठवते. परंतु, मागणी मान्य होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून थकित भाडे भरले जात नाही​. त्याचा मोठा फटका मनपाच्या महसुलास बसत आहे. त्यामुळे भाडे वसूल करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत लीज करार करून मनपा कायद्यातही दुरुस्ती करण्याची मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनीही केली आहे.