महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसच

आज शपथविधी : पंतप्रधानांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित


7 hours ago
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसच

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, यावरचा सस्पेन्स अखेर बुधवारी उठला. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले. महायुतीचा शपथविधी सोहळा गुुरुवार, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासमोर सत्ता स्थापनेसाठी दावा केला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची शिफारस करण्यात आली आहे. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. दरम्यान, राजशिष्टाचार विभागाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. गुरुवारी सायं. ५.३० वा. हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मी त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली आहे. शिवसेनेने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. मागील अडीच वर्षात एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. मला काय मिळाले. यापेक्षा राज्यातील जनतेला काय देऊ शकतो, याचा विचार करून काम केले. हे सरकार जनतेसाठी काम करणार आहे.
_ एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना
मुंबई पोलिसांकडून राहणार चोख बंदोबस्त
शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यावेळी १० पोलिस उपायुक्त, २० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० निरीक्षक, १५० साहाय्यक व उपनिरीक्षकांसह १५०० हून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. आझाद मैदान परिसर हा ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.