नोटरींच्या सहभागाशिवाय जमीन हडप अशक्य

मंत्री सिक्वेरा : जिल्हाधिकारी कार्यालयात वकिलांसाठी रूम


7 hours ago
नोटरींच्या सहभागाशिवाय जमीन हडप अशक्य

दीपप्रज्वलन करताना मंत्री आलेक्स सिक्वेरा. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : सध्या जमीन हडप प्रकरणांचा मुद्दा ऐरणीवर आहे. नोटरीच्या सहभागाशिवाय हे करणे शक्य नाही. आपण कोणाकडेही बोट दाखवत नाही. हे बदलण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. वकील संरक्षण विधेयकावर आश्वासन देत नाही; पण कायदा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण गोवा जिल्हा वकील संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात वकिलांसाठी रूमची सोय असावी, अशी मागणी कायदामंत्री सिक्वेरा यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही सुरू होती. बुधवारी या रूमचे उद्घाटन मंत्री सिक्वेरा यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा वकील संघटनेचे प्रसाद नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे, उदय प्रभुदेसाई, अ‍ॅड. दिलेश्वर नाईक आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी वकील संरक्षण कायद्याची मागणी केली.
सबरजिस्ट्रार कार्यालयात काही चुकीच्या गोष्टी होत असतात. वकिलांच्या सहकार्याशिवाय या गोष्टी बंद करू शकत नाही. नोटरींकडून लाखो कागदपत्रे प्रमाणित केली जात असतात. जमीन हडप प्रकरणे नोटरींच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक होण्यासाठी वकिलांच्या सहकार्याची गरज आहे.
_ आलेक्स सिक्वेरा, कायदामंत्री