खुरसाकडे-उसगाव येथे जीपला कारची धडक; कारमधील दोघे जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:22 pm
खुरसाकडे-उसगाव येथे जीपला कारची धडक; कारमधील दोघे जखमी

फोंडा : खुरसाकडे-उसगाव येथे सुमो जीपला मागाहून सुसाट वेगाने धावणाऱ्या कारची धडक बसून कारमधील दोघे जण जखमी झाले. कारचालक साकिब मुख्तार शेख (२०, उसगाव) व अयाम मुख्तार शेख (१७, उसगाव) हे दोघे बंधू जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. अपघातात धारबांदोडा तालुक्यातील कृषी खात्याच्या सुमोमधील चालक व अधिकारी सुखरूप बचावले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, धारबांदोडा येथील कृषी खात्याची सुमो (क्र. जीए -०७- जी - १३०४) घेऊन चालक अधिकाऱ्याला घेऊन पणजी येथे जात होता. खुरसाकडे- उसगाव येथे पोहचताच मागाहून सुसाट वेगाने धावणाऱ्या जीए - ०२-एस - १५१४ क्रमांकाच्या कारची धडक सुमोला बसली. यात कारचालक व बाजूला बसलेला युवक जखमी झाला. अपघातावेळी पिळये आरोग्य केंद्रातून एका वृद्ध महिलेला गोमेकॉत नेणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.