मांद्रेतील स्थानिकांचा इशारा : पोलिसांना निवेदन
पेडणे : मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला केला आहे. त्या हल्लेखोरांना २४ तासाच्या आत अटक करावी. अन्यथा कायदा सुव्यवस्था जनतेकडून बिघडल्यास त्याला पूर्ण जबाबदार सरकार आणि पोलीस असतील. मांद्रे पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करून हे प्रकरण मिटणार नाही. मांद्रेतील स्थानिक नागरिकांनी मांद्रे पोलीस स्थानकावर धडक देऊन पोलीस निरीक्षक चिमुलकर यांना याबाबत निवेदन सादर केले.
माजी सरपंच अॅड. अमित सावंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बुधवारी सायंकाळी माजी आमदार दयानंद सोपटे, आमदार मायकल लोबो यांनी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तातडीने मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांची बदली केली. परंतु बदली करून हे प्रकरण थंड होणार नाही. हल्लेखोरांचा शोध घेऊन २४ तासांच्या आत त्यांना अटक करावी. अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार स्थानिक नसतील, असा इशारा अमित सावंत यांनी दिला.
पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी कोणते गुन्हे व्यवस्थित हाताळले. याची चौकशी आता सरकारने करायला हवी. त्यांना २४ तासाची मुदत देऊन हे प्रकरण शोध घेण्यासाठी सरकारने संधी द्यायला हवी होती. परंतु त्यांची तातडीने बदली केली, असे अमित सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस स्थानक परिसरात महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्यात आमदाराचा काहीच हात नसल्याचा दावा करत हे प्रकरण वेगळेच असल्याचा संशय आणि कुजबूज त्या परिसरात सुरू होती.
अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी गुन्हेगारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी हे प्रकरण मांद्रे गावात प्रथमच घडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यासाठी गृह खात्याअंतर्गत त्वरित चौकशी करावी, असे सांगितले.
देवेंद्र प्रभुदेसाई यांनी खऱ्या गुन्हेगारांना समोर आणावे, अशी मागणी केली.
हल्लेखोरांवर गुन्हा नोंद
मांद्रे पोलिसांनी माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला झाला त्यासंबंधी संशयिताविरोधात भा. दं. सं. कलम ३५२, ११८ (१) २६ (२) ३२४ (२ ) या कलमाखाली गुन्हा नोंदवला. सध्या मांद्रे पोलीस निरीक्षक शरीफ यांची बदली केल्यानंतर तात्पुरता ताबा नारायण चिमुलकर यांच्याकडे देण्यात आला आहे.