वेर्णा औद्योगिक वसाहतीतील अपघातात कंटेनर चालक ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:54 pm
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील अपघातात कंटेनर चालक ठार

वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी (दि. ३) रात्री एक कंटेनर तेथील तीन वाहनांना धडकल्यावर रस्त्याकडेच्या घळीत कोसळल्याने चालक अल्ताफ बशीर पठाण हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक आनंद गावकर पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान अल्ताफ हा वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये कंटेनर (एनएल- ०१-एजी- ०४२०) घेऊन आला होता. या वसाहतीतील मार्कसन कंपनीकडून लुपिन कंपनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या डाव्या बाजूला कंटेनर उभा करण्याचा प्रयत्न त्याने केला. तथापी त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर उजव्या बाजूला गेला. तेथे रस्त्याकडेला उभ्या करण्यात आलेल्या स्कॉर्पियो कार, दोन आयशर ट्रक यांना त्या कंटेनरची धडक बसली. त्यानंतर कंटेनर ट्रक तसाच पुढे जात रस्त्यालगतच्या घळीत कोसळला. अपघातात चालक अल्ताफ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले. तथापी तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.