यंत्रणेचे दुर्लक्ष : कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
फोंडा : काजूमळ-मोले येथील दूधसागर नदीवर बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्याचे काम जोरात सुरू आहे. रेती उपसा करण्यासाठी परप्रांतीय कामगारांचा वापर केला जात आहे. राज्यात बेकायदेशीरपणे रेती उपसा करण्यास बंदी असूनही परिसरात व्यवसाय सुरू असल्याने सरकारी यंत्रणा निद्रावस्थेत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
काजूमळ येथे गावाजवळील दूधसागर नदीतील रेती बेकायदेशीरपणे उपसा करण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी जेसीबीच्या सहाय्याने रेती उपसा करण्यात येत होता. पण, गेल्या १५-२० दिवसांपासून रेती उपसा करण्यासाठी परप्रांतीय कामगारांना पाचारण करण्यात आले आहे. परप्रांतीय कामगार नदीतील रेती उपसा करीत असून दिवसातून ५-६ ट्रक रेतीची वाहतूक केली जाते. कामगारांनी उपसा केलेली रेती सकाळच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकात भरली जाते. रेती ट्रकमधून थातोड व कोडली-तिस्क मार्गावरून वाहतूक केली जात आहे.
काजूमळ भागातील निर्जन स्थळावर असलेल्या नदीतील रेती गेल्या १-२ वर्षांपासून वाहतूक केली जात आहे. सध्या रेती उपसा करण्यासाठी झारखंड व उत्तर प्रदेश येथील कामगारांना बोलावण्यात आले आहे. राजकीय सहकार्य मिळत असलेली खास टोळी या व्यवसायात गुंतली असल्याचा संशय स्थानिक लोकांना आहे. दबावामुळे स्थानिक लोक याविरुद्ध आवाज उठविण्यास पुढे येत नाहीत. रेती उपसा करणारे कामगार नदीच्या काठावर दुपारच्यावेळी जेवण बनवतात. एखादा अनोळखी व्यक्ती रेती उपसा करण्याच्या ठिकाणी गेल्यास कामगारांकडून पिकनिकसाठी आल्याचे सांगितले जाते. अंदाजे ३०-४० परप्रांतीय कामगार रोज सकाळी ते संध्याकाळ पर्यंत नदीतून रेती उपसा करीत आहेत.
नदीची खोली वाढल्याने पर्यटकांना धोका
काजूमळ भागातील दूधसागर नदीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक पिकनिकसाठी येत असतात. नदीतील रेती उपसा केल्याने पर्यटकांना पाण्याचा अंदाज येऊ शकणार नाही. त्यामुळे पिकनिकसाठी येणारे पर्यटक परिसरात बुडण्याची भीती आहे. परिसरात झाडांखाली उपसा केलेली रेती साठवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात रेती दिसून येत आहे. मात्र, दिवसा उपसा केलेली रेती दुसऱ्या दिवशी सकाळी वाहतूक केली जात आहे.