उड्डाणपुलाचे नियोजनशून्य काम : बगलरस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी
अरुंद रस्त्यांमुळे अशा प्रकारे पर्वरीत वाहने खोळंबतात. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : पर्वरीतील तिस्क-जुना बाजार ते दामियान दी गोवा पर्यंतच्या रस्त्यावर उड्डाणपुलासाठी खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र यात कसलीही शिस्त नसल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अरुंद बगलरस्त्यांमुळे वाहने नेण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. या बगलरस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
पणजीच्या दिशेने जाणारऱ्या येथील श्री वेताळ महारुद्र मंदिरासमाेरील रस्त्यालगत बॅरिकेड्स लावून रस्ता अरुंद करण्यात आला आहे. येथून वाहनांच्या रांगा सुरू होतात. पुढे पिंटो हॉस्पिटलजवळ जेमतेम एकच चारचाकी वाहन सुटेल, इतकी जागा शिल्लक आहे. त्यामुळे आपले वाहन पुढे रेटण्यासाठी वाहनचालकांत स्पर्धा लागते व त्यातून वाहतूक कोंडी होते. या भागात रस्त्यावर केवळ पूडमिश्रित खडी टाकण्यात आली असून दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. धूळ उडू नये म्हणून पाण्याचा फवारा रस्त्यावर अधूनमधून मारला जातो. मात्र हे काम निष्काळजीपणाने केले असल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी फवारल्यामुळे चिखल तयार होतो. अनेक दुचाकीस्वार त्यात घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत. हाच प्रकार चढणीवरील वळणावर दिसून येतो. येथे रस्त्याच्या बाजूला खडी आणि माती टाकून बगलरस्ता केल्याचे भासविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी रस्ता अरुंद झाला असून एकच वाहन जाण्याइतकी जागा असल्याने वाहतूक खोळंबते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागात एकही पोलीस दिसून येत नाही. केवळ तिस्क परिसरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मात्र जिथे पोलीस बळाची जास्त गरज आहे, त्या भागात पोलीस तैनात केलेले नाहीत. आपले वाहन पुढे दामटण्याच्या चढाओढीत अनेक वेळा वाहनांना धक्का लागून वाद उद्भवतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. काही वेळा एखादे वाहन बंद पडल्यास ते ओढून नेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे त्याचाही परिणाम होतो. या प्रकारांमुळे दिवसभर या भागात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.
उतारणीवर अपघाताची शक्यता
दामियान दी गोवा शोरूम जवळच्या उतरणीवर बगलरस्ता करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेला जमिनीचा उंचवट भाग न कापल्यामुळे वाहने एका बाजूला कलतात. त्यामुळे अवजड वाहने उलटण्याचा धोका आहे. येथून दुचाकी नेताना वाहनचालकांची त्रेधातिरपिट उडते. अपघात घडण्याची वाट न बघता हा उंचवट भाग कापावा, अशी मागणी होत आहे.