राज्याची ग्रामीण साक्षरता ९२.८ टक्के
पणजी : ग्रामीण साक्षरतेत गोवा देशात सहाव्या स्थानी आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये राज्यातील ग्रामीण साक्षरतेत घट झाल्याचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
२०२२-२३ मध्ये गोव्याची ग्रामीण साक्षरता ९४.२ टक्के इतकी होती. त्यावेळी गोवा देशात तिसऱ्या क्रमांकावर होता. परंतु, २०२३-२४ मध्ये घट होऊन ग्रामीण साक्षरता ९२.८ टक्के झाल्याचे मंत्री चौधरी यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
सर्वाधिक ग्रामीण साक्षरतेच्या यादीत सध्या लक्षद्वीप आघाडीवर आहे. तेथील ग्रामीण साक्षरता १०० टक्के इतकी आहे. त्यानंतर मिझोरम (९८.१ टक्के), नागालँड (९५ टक्के), केरळ (९४.२ टक्के), मेघालय (९३.६ टक्के) आणि गोवा व त्रिपुरा प्रत्येकी (९२.८ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.
दरम्यान, सर्वच राज्यांतील ग्रामीण भागांमधील साक्षरता शंभर टक्के व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. विविध उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांतील ग्रामीण साक्षरतेमध्ये वाढ झाल्याचेही मंत्री चौधरी यांनी नमूद केले आहे.
राज्यातील ग्रामीण साक्षरता (टक्क्यांत)
वर्ष साक्षरता
२०१९-२० ८७..९
२०२०-२१ ९०.३
२०२१-२२ ९०.८
२०२२-२३ ९४.२
२०२३-२४ ९२.८