पेडणे : मांद्रें पंचावर हल्ला करणाऱ्यांना २४ तासात अटक करा

सोपटे, लोबो यांनी घेतली पंचांसह मुख्यमंत्र्यांची भेट. पंचांद्वारे पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
04th December, 05:23 pm
पेडणे : मांद्रें पंचावर हल्ला करणाऱ्यांना २४ तासात अटक करा

पणजी : मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच महेश कोनाडकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यातील संशयितांना २४ तासात अटक करण्यासह पोलीस निरीक्षकाचीही बदली करण्याची मागणी माजी आमदार दयानंद सोपटे, आमदार मायकल लोबो यांच्यासह पेडणे तालक्यातील पंचांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. २४ तासात कारवाई न झाल्यास पुढील कृती करण्याचा इशारा आमदारांसह पंचांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला. हल्ल्याची निष्पक्ष चौकशी होऊन पोलीस निरीक्षकांची बदली करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.

मांद्रेचे पंच महेश कोनाडकर यांच्यावर सकाळी घराशेजारी अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला झाला. कारमधून आलेल्या मास्कधारी  इसमांनी लोखंडी रॉडने कोनाडकर यांना मारहाण केली. ह्या भ्याड हल्ल्यामुळे मांद्रेसह संपूर्ण पेडणे तालुका हादरला आहे. माजी आमदार दयानंद सोपटे, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेंचे सरपंच मिंगेल फर्नांडिस, माजी सरपंच प्रशांत नाईक, धारगळचे माजी सरपंच अनिकेत साळगावकर, देवेंद्र कांदोळकर यांच्यासह इतरांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. हल्लेखोरांना अटक करण्यासह मांद्रे पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी त्यांनी केली. योग्य तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याची माहिती माजी आमदार दयानंद सोपटे व मायकल लोबो यांनी दिली.

गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही : दयानंद सोपटे

मी यापूर्वी मांद्रे तसेच पेडण्याचा आमदार राहिलेलो आहे. मांद्रें मतदारसंघात यापूर्वी इतर भागातील बरेच जण आमदार झालेले आहेत. 'तुका मायकल जाय...' असे विचारत पंचाला मारहाण करणे हा गंभीर प्रकार आहे. मांद्रेसह पेडण्यातील जनता असली गुंडगिरी खपवून घेणार नाही. २४ तासाच्या आत हल्लेखोराना अटक झाली नाही तर पुढील कृती आम्ही करणार आहोत, असे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी भेटीनंतर सांगितले.

विविध कामानिमित्त मांद्रेतील पंच, लोक माझ्या संपर्कात : मायकल लोबो

माझे नाव घेत पंचाला झालेली मारहाण मी सहन करणार नाही. या प्रकरणी मांद्रेंचे पंच महेश कोनाडकर व ग्रामस्थांना माझा कायम पाठिंबा असेल. विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे. निवडणूक लढविण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी पंचाला झालेल्या मारहाणीचा मी निषेध करतो. हल्लेखोरांना अटक करून निश्पक्ष चौकशीचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.


हेही वाचा