मडगाव : आपल्याला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी कधीही केलेली नाही. मतदारसंघातील विकासकामे होणे व लोकांची सेवा करणे हेच आपले उद्दिष्ट असून त्यानुसार काम सुरू आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
मडगाव येथे पत्रकार परिषद घेत सभापती तवडकर यांनी लोकोत्सवाबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकारांच्या मंत्रिमंडळ फेरबदलावरील प्रश्नावर ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बदलाच्या मुद्द्यावर आपणार स्वारस्य नाही. आपण कधीही मुख्यमंत्री करा किंवा मंत्री करा अशा प्रकारची मागणी केलेली नाही. काही प्रसारमाध्यमांकडून पुन्हा पुन्हा हा मुद्दा पुढे आणला जात आहे. जे पद माझ्याकडे आहे त्याला योग्य न्याय देणे, मतदारसंघात विकासकामे करत लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण करत आहे. मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो व लोकांना न्याय मिळवून देता येत नसल्यास त्या पदाला काही अर्थ राहणार नाही.
गोवा विधानसभेचे अधिवेशन हे जानेवारी महिन्यात होईल. हा विषय सध्या कॅबिनेटसमोर आहे, कॅबिनेट बैठकीनंतर त्यावर निर्णय होईल. त्यानंतरच अधिवेशनाच्या तारखा निश्चित होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न
अंत्योदय तत्त्वावर काम करणे, लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावणे या कामावर मी लक्ष देत आहे. लोकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे. तवडकर यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, मंत्री व्हायचे आहे, असे कुणीही कितीही उकरून काढले तरीही आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य कुणाला आपण कधीही आपणास मंत्रिपद मिळावे, असे सांगितलेले नाही व मागणी केली नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही.