म्हापसा : थिवी कोमुनिदादच्या पदाधिकार्‍यांविरूध्द कोलवाळ पोलिसांत तक्रार

बनावटगिरी व फसवणूक करून खासगी विद्यापीठाला जमीन दिल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th December, 05:08 pm
म्हापसा : थिवी कोमुनिदादच्या पदाधिकार्‍यांविरूध्द कोलवाळ पोलिसांत तक्रार

  म्हापसा : थिवी येथील टेकडीवर प्रस्तावित खासगी विद्यापीठाच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ आणि कोमुनिदाद गावकारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबवला आहे. या विद्यापीठासाठी पुणेस्थित एमआयटी संस्थेला विना लिलाव २  लाख चौरस मीटर जमीन देऊन बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा दावा करीत बुधवारी दुपारी हळदोणाचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्या उपस्थितीत थिवी कोमुनिदाद गावकार आणि ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्याकडे लिखित तक्रार प्रत सुपूर्द केली.

कोमुनिदाद अध्यक्ष मिंगेल सिक्वेरा, अ‍ॅटर्नी जेम्स डिसोझा, खजिनदार जेसलन परेरा व इस्क्रिवाव प्रणव पार्सेकर या कोमुनिदाद पदाधिकार्‍यांविरूध्द कोलवाळ पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी डग्लस सिक्वेरा, गॉडफ्री डिलिमा, जोस डिमेलो, लॉरेन्स फेर्राव, आंतोनिओ फोन्सेका, अॅड्रीयन डिसोझा, अ‍ॅस्सूंप्शन डिसोझा, ब्राझ डिसोझा, जोनाथन डिमेलो, मथायस लोबो, हायजीनस डिसोझा, मेलिसा फर्नांडिस ई कुलासो, अँजेलिना फेर्राव, मोली दा सिल्वा, रॉबर्ट कुलासो, माधव पाटील, पांडुरंग पाटील, नेल्सन पेस व सेबेस्तियन डिसोझा यांनी ही संयुक्तरित्या तक्रार दाखल केली आहे.

वरील कोमुनिदाद पदाधिकारी आणि कर्मचार्‍याने संगनमताने कोमुनिदादच्या जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार केले आणि जाणूनबुजून हे दस्ताऐवज सत्य म्हणून सादर करत विना लिलाव जमीन मंजूर करण्यासाठी सरकारची दिशाभूल केली. आणि पुणेस्थित एमआयटी ग्रुप इन्स्टीट्यूटच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमी (एमएईईआर) या संस्थेला कोमुनिदादची २ लाख चौ. मी. जमीन खासगी विद्यापीठ उभारण्यास दिली. हा एकंदरीत बनावटगिरी आणि फसवणूकीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वरील संशयितांविरूध्द भा.दं.सं.च्या ४२०, ४६८, ४७४ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी या तक्रारीत पोलिसांकडे करण्यात आली आहे.


हेही वाचा