चार वर्षांची आकडेवारी सादर : सौर, कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेचा समावेश
पणजी : राज्यात गेल्या चार वर्षांत अक्षय ऊर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ०.८४ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली होती. तर २०२३-२४ मध्ये ६७.९५ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली. केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार राजेश रंजन यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी राज्यात प्रामुख्याने सौर आणि कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेचा समावेश आहे. राज्यात पवन ऊर्जा, चिपाडेपासून ऊर्जा, बायोमास, लहान आणि मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपासून अक्षय ऊर्जा निर्मिती होत नाही. राज्यात काचऱ्यापासून वीजनिर्मिती २०२१-२२ पासून सुरू झाली आहे. २०२०-२१ मध्ये राज्यात १.८४ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली होती.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सौर ऊर्जेपासून १५.९३, तर कचऱ्यापासून ०.८९ अशी एकूण १६.८२ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली. २०२२-२३ मध्ये सौर ऊर्जेपासून १४.८७ तर कचऱ्यापासून ५.०९ अशी एकूण १९.९६ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली. २०२३- २४ मध्ये सौर ऊर्जा निर्मितीचे प्रमाण वाढले. यावर्षी सौर ऊर्जेपासून ५९.९९ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली होती. तर कचऱ्यातून ७.९६ दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली.
२०२३-२४ मध्ये देशात सर्वाधिक अक्षय ऊर्जा निर्मिती
संपूर्ण देशाचा विचार करता २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.६५ लाख दशलक्ष युनिट अक्षय ऊर्जा निर्मिती झाली आहे. गेल्या चार वर्षातील ही सर्वाधिक अक्षय ऊर्जा निर्मिती आहे. यावर्षी देशात तयार झालेल्या एकूण ऊर्जेपैकी २०.७९ टक्के ऊर्जा निर्मिती ही अक्षय ऊर्जेतून झाली आहे. केंद्र सरकारने सौर ऊर्जेची निर्मिती वाढवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यासाठी खात्यातर्फे सोलर पार्क विकसित केले जात असल्याचे उत्तरात म्हटले आहे.