स्वयंपाकघरातील कचरा हाताळण्यासाठी करा किचन गार्डनिंग

कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट कशी लावायची? आजच्या घडीला हा प्रश्न संपूर्ण भारताला सतावतोय. खासकरून शहरी भागात राहणाऱ्या नागरीकांपुढे दिवसाअखेरीस घरात गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ह्याबाबत एक मोठे प्रश्नचिन्हच असते.

Story: साद निसर्गाची |
just now
स्वयंपाकघरातील कचरा  हाताळण्यासाठी करा   किचन गार्डनिंग

आधी कचरा गोळा करून तो जपून ठेवा, सुका कचरा ओल्या कचऱ्यापासून वेगळा करा, कचरेवाल्याच्या वाटेला डोळा लावून बसा अशा लांबलचक प्रक्रियेचे अनुसरण शहरी भागात राहणाऱ्या नागरीकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करावे लागते. त्यातल्या त्यात जर कचरा गोळा करणाऱ्याने एक-दोन दिवस कामाला दांडी मारली तर मग तर पंचाईतच! घरात जमा झालेला ओला कचरा खासकरून स्वयंपाकघरातील कचरा एक दिवस जरी विल्हेवाट लावायचा राहून गेला तर तो कुजतो आणि संपूर्ण घरात त्याचा वास पसरतो. 

यावर सगळ्यात साधा, सरळ, सोपा पण सगळ्यात जास्त दुर्लक्षित केलेला उपाय म्हणजेच स्वयंपाकघर बागकाम, ज्याला आपण किचन गार्डनिंग असेही म्हणतो. स्वयंपाकघरात कितीतरी प्रकारचा बायोडिग्रेडेबल (पर्यावरणाला हानी न पोहोचवता मातीमध्ये विघटित होणारा) कचरा निर्माण होत असतो. हा कचरा एखाद्या झाडाच्या मुळाशी घातल्यास  झाडाला उत्तम पोषण देतो. तथापि, हा कचरा परस्पर बाहेर फेकण्याऐवजी बागेत वापरण्यासाठी सेंद्रिय खतामध्ये प्रभावीपणे रूपांतरित केला जाऊ शकतो. 

स्वयंपाकघरातील कचरा मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात वापरात आणलेले पाणी (ग्रेवॉटर) देखील उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरात आणले जाऊ शकते. 

ग्रेवॉटर पुर्नवापरात कसे आणाल?

पाण्याचा सगळ्यात जास्त वापर स्वयंपाकघरात होत असतो. तांदुळ, फळे, भाजी धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी स्वयंपाकघरात दिवसागणिक कितीतरी लीटर पाणी वापरले जाते. स्वयंपाकघरात वापरात आणलेले हे पाणी नळी किंवा पन्हळाद्वारे मातीत जाते. पन्हळाद्वारे बाहेर फेकून हे पाणी वाया घालवण्यापेक्षा आपण ते परसबाग फुलवण्यासाठी पुर्नवापरात आणू शकतो. तांदुळ धुतलेले पाणी, चहापत्ती, पालेभाज्या/फळे धुतलेले पाणी झाडाची उत्तमप्रकारे वाढ करु शकते. तांदळाच्या पाण्यात असलेला स्टार्च हा घटक वनस्पतींच्या पानांवर एक नैसर्गिक चमक सोडतात. तांदळाच्या पाण्यातील आवश्यक पोषक तत्वे वनस्पतींच्या वाढीस चालना देतात. चहा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या चहापत्तीचे थंड पाणी गुलाबाच्या रोपट्याला घातल्यास रोपाला छान बहर येतो. 

स्वयंपाकघरातील कचरा कसा हाताळाल?

आपण खालीलप्रकारे स्वयंपाकघरातील कचऱ्याची योग्यरीत्या  विल्हेवाट लावू शकतो. 

कंपोस्ट तयार करणे : सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्टिंग हा एक उत्तम मार्ग आहे. शिल्लक राहिलेले अन्न, अंगणातील कचरा, सुकलेली पाने, कागद, भाजीचे देठे, बाह्यफलभित्ती वापरुन आपण उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत बनवू शकतो. यासाठी तुम्ही 'किचन कंपोस्टिंग बिन' खरेदी करून घरामागील अंगणात कंपोस्टिंग सिस्टीम तयार करु शकता. कंपोस्ट बनवताना काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे असते. कंपोस्ट बिन नेहमी सुर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवावे. कचऱ्याचे व्यवस्थित संमिश्रण व्हावे म्हणून कंपोस्ट बिन नियमितपणे वरखाली करणे आवश्यक आहे. कंपोस्टींगमुळे लँडफिल्समध्ये जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होते, मातीची सुपीकता वाढते, रासायनिक खतांची गरज कमी होते. 

सामुदायिक कंपोस्टिंगमध्ये सहभाग घेणे : तुम्ही सामुदायिक कंपोस्टिंग बनवण्यामध्ये सहभागी होऊ शकता. सामुदायिक कंपोस्टिंग ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक आस्थापनांमधून सेंद्रिय कचरा गोळा त्याचे कंपोस्ट बनवले जाते. हे कंपोस्ट नंतर सेंद्रिय खत किंवा मातीची सुपीकता वाढवण्यासाठी वापरात आणली जाते.

फूड बँकांना अन्न दान करणे : पौष्टिक व स्पर्श न केलेले अन्न बाहेर फेकून देण्याऐवजी तुम्ही ते फूड बँकांना दान करू शकता.

पुर्नवापर करण्यायोग्य नसलेल्या वस्तूंची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे : प्लास्टिकच्या पिशव्या, डिस्पोजेबल डायपर, फुटलेली काच यासारख्या पुर्नवापर न करता येण्याजोग्या वस्तू कागदात व्यवस्थित गुंडाळून कचरापेटीत टाका. 

विषारी कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे : झुरळ, पाल, उंदीर मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर करत असाल तर ह्या औषधांचे कागदी बाॅक्स/पुठ्ठा/पाकिटे कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरु नका. स्वयंपाकघरात विषारी कचरा असल्यास तो वेगळा करा आणि व्यवस्थित गुंडाळून कचरापेटीत टाका.

कंपोस्टींगच्या निमित्ताने रिसायकलिंग करणे : कंपोस्ट तयार करण्यासाठी आपण वापरात नसलेल्या प्लास्टिक बादल्या, कॅन, कंटेनर, क्रेट वापरात आणू शकतो.

बाल्कनीमध्ये रिसायकल केलेल्या वस्तू ठेवल्यास त्या जुनाट दिसतात म्हणून कित्येक गृहीणी कंपोस्टींंग करणे टाळतात. ह्यावर उपाय म्हणून आपण 'खांबा कंपोस्ट' हा किचन गार्डनिंग टूल वापरु शकतो. खांबा कंपोस्टमध्ये तीन स्तरीय एरोबिक कंपोस्ट बिन वापरले जातात. तिसरे बिन वापरात येईपर्यंत पहिल्या बिनमध्ये कंपोस्ट तयार झालेले असते. खांबा कंपोस्टर बिन कंपोस्टर बाल्कनी, बाग किंवा टेरेसवर लहान जागेत आरामात बसू शकते. हा कंपोस्टर खूप हलका व दिसायला डिझाइनर असल्या कारणाने खांबा कंपोस्टिंग पद्धत लोकप्रिय होऊ लागली आहे. चला तर मग आजपासूनच कंपोस्ट तयार करायला सुरुवात करुया.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)