किल्ले रायगड

Story: माहीत आहे का? |
just now
किल्ले रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अगदी कमी कालावधीत महाराजांनी अनेक गड किल्ले बांधून काढले. महाराष्ट्रामध्ये ३५० पेक्षा जास्त गडकिल्ले आहेत. ह्या ज्ञात-अज्ञात गडकिल्यांमध्ये स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ह्या किल्याला संपूर्ण जगामध्ये वेगळंच महत्व आहे. राजांनी ‘तख्तास जागा हाच गड करावा’ असे का म्हटले? हे तुम्हाला रायगड किल्ल्याची माहिती घेतल्यानंतरच कळेल. 

रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यात आहे. एखादा गरुड डोंगराच्या उंच टोकावर बसावा तसाच हा किल्ला काळ्याकुट्ट डोंगराच्या खडकामध्ये तयार केला आहे. आजूबाजूचा मुलुख शत्रूसाठी अवघड आणि आपल्यासाठी सुरक्षित आहे, तसेच येथून समुद्रावर सुद्धा लक्ष ठेवता येईल हे बघून राजांनी स्वराज्याच्या तख्तासाठी या जागेची निवड केली. रायगड या किल्याला आधी ‘रायरी’ नावाने संबोधले जायचे. शिवरायांच्या हाती येण्यापूर्वी ह्याला किल्ल्याचे स्वरूप नव्हते, फक्त एक काळ्या पाषाणातील डोंगर होता. पहिल्यांदा महाराजांनी रायगडाला बघितले तेव्हाच हा गड त्यांच्या डोळ्यात भरला. ह्या हिंदुस्थानच्या भूमीवर अनेक परकीयांनी राज्य केले. परंतु रायगड हा नेहमी सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला. प्रत्येक सत्ताधाऱ्यांच्या काळात रायगडचे नामकरण करण्यात आले. आजपर्यंत या किल्ल्याला १५ नावे देण्यात आली. 

इतिहासात या रायगडाने बरेच सोहळे अनुभवले. परंतु सर्वात देखणा सोहळा पार पडला तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला देश विदेशातील सर्वांनीच उपस्थिती लावली होती. इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये कोरून ठेवावी अशीच ती घटना होती. राज्यभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर काही दिवसातच माँसाहेब जिजाऊ यांचे निर्वाण झाले. ह्याच ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी राजे ह्यांचा १६ जानेवारी १६८१ रोजी राज्यभिषेक सोहळा पार पडला आणि छत्रपती शिवाजी महराजांच्या निधनानंतर त्यांनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. 

हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते. एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला सुद्धा जमणार नाही असे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे केले होते. रायगडावरचे तळे, देऊळ, महाल, दरवाजे, राजदरबार असे संपूर्ण बांधकाम त्यांचा अधिपत्याखाली हिरोजीने करून घेतले. आपण दिलेली जबाबदारी हिरोजीने चोख पार पाडली हे बघून राजे खूप खुश झाले. राजांनी खुश होतं हिरोजीना विचारले, “हिरोजी, आज तुम्ही मागायचं. कुठलाही विचार न करता आणि आम्ही ते द्यायचं. मागा हिरोजी, संकोच न करता जे पाहिजे असेल ते मागा.” हिरोजी थोडा वेळ गप्प झाले. पुन्हा महाराजांनी हिरोजीना विचारणा केली. हिरोजी म्हणाले, “राजं, आणिक काही नको, फक्त रायगडावर जे जगदीश्वराच मंदिर आहे त्याच्या एका पायरीवर नाव कोरायची अनुमती द्या फक्त.” महाराज अचंबित झाले. “मागायचं तर वतन, जहागीरी मागता आली असती. मागितलं तर काय? पायरीवर नाव कोरायची परवानगी???” महाराजांनी हसत हसत होकार दिला. 

आज जरी तुम्ही रायगडावर गेलात आणि तिथे जगदीश्वराच्या मंदिरात गेलात, तर तिथे तुम्हाला एका पायरीवर ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुळकर’ असं लिहिलेलं दिसेल.