कधीतरी एखादं फळ कापलं की त्यातून हळूच एक कीड बाहेर येताना आपल्याला दिसते. अश्याच प्रकारच्या किडी आपल्या पोटात देखील असतात. त्यांना कृमी असं संस्कृत भाषेत म्हटलं जातं. या कृमींना जंत असे आपण म्हणतो. फळाला लागलेली कीड आतून जसे फळ खाऊन टाकते, त्याचप्रमाणे तुम्ही जे जे अन्न खाता ते हे पोटातील जंत फस्त करून टाकतात व त्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण होत नाही. हे जंत आपल्या शरीरात वाढतात, ते आतड्याच्या आतील भिंतींना चिकटतात आणि त्यांची संख्या वेगाने वाढवतात, ज्यामुळे अनेक त्रास होतात आणि तुम्हाला माहित आहे का? या जंतांना तुमच्या सारखेच गोड आंबट पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, चॉकलेट्स, आयस्क्रीम, क्रीम बिस्किट्स, दही इ. पदार्थ आवडतात. त्यामुळे शरीराला त्रास करणारे हे जंत पोटात तयार होऊच नये म्हणून काळजी घ्यावी लागते. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखावे?
जंत होऊ नये म्हणून आणि झाले असतील तर काय करावे?
आम्हाला लहानपणी आजी दर रविवारी कडू किरायते द्यायची. तेव्हा ते अजिबात आवडत नसे पण ते घेण्याची एक युक्ती आजीने सांगितली होती. ती तुम्हाला मी सांगेन. किरायते ही वनस्पती जंतांना गायब करते. आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे किरायते, याचा उपयोग तापात सुद्धा होतो. याचा काढा करून घेतला जातो. लहान मुलांना वाटीभर काढा पुरतो. तर आजीची युक्ती अशी की तो कडू काढा काठ असलेल्या पेल्यात घ्यायचा, आरामात खुर्चीत बसून तोंड वर करून मोठा आ... करायचा आणि काढा सरळ घश्यात ओतायचा व पटकन गिळून टाकायचा. असे केले असता काढ्याचा स्पर्श जिभेला होत नाही आणि कडू सुद्धा लागत नाही. थोडं कडू लागलंच तर वरून जिरं चावून खायचं. नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करा. हे किरायतं घेतल्याने जंत तर मरतातच, शिवाय लिव्हरचे आरोग्य सुद्धा चांगले रहाते.
आहारात शेवग्याच्या शेंगा बियांसकट खाव्या. त्याने जंत मरतात.
अननसाच्या सीजनमध्ये जंतांना गायब करण्यासाठी अननसाचे छोटे तुकडे करून त्यावर थोडिशी मिरपूड टाकून खावे.
ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, सैंधव मीठ, दालचिनी, मोहरी, कढीपत्ता वगैरे सुद्धा जंतनाशक आहेत. हे पदार्थ आपण फोडणीसाठी वापरतो.
जंतांमुळे पोटात दुखत असेल तर ओवा, हिंग घालून सोलकढी प्या, त्याने पोटाचे दुखणे कमी होते.
आणि हं आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन जंतांसाठी औषध घ्यावं लागेल की नाही ते जाणून घ्या.
अश्या प्रकारे योग्य आहार आणि औषध घेऊन जंतांचा त्रास घालवा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य