मायरन राॅड्रिग्ज प्रकरणात आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा दाखल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यातील संशयित मायरन राॅड्रिग्ज प्रकरणात गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईओसीने मायरनची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज, दुसरी पत्नी दीपाली परब यांच्यासह आयडीलीक गोवन गेटवेज अॅण्ड डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे या सात जणांविरोधात ‘लूक आऊट’ जारी केले आहे.
जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी ईओसीने संशयित मायरन राॅड्रिग्ज याच्यासह इतरांवर २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ईओसीने राॅड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब हिला संशयित केले आहे. दोघांनी गोव्यातील ३८ जणांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संदर्भात ईओसीने गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. राॅड्रिग्ज याने २००९ ते १७ ऑगस्ट २०२३ या काळात १३० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले. राॅड्रिग्ज याने आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीत ३.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, ईओसीने कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे यांना संशयित करून चौकशी केली.
मुख्य संशयित मायरन गुन्हा दाखल होण्यापूर्वी लंडनमध्ये पळून गेल्यामुळे त्याच्या विरोधात इंटरपोलद्वारे ‘रेड काॅर्नर’ नोटीस जारी केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मायरन, सुनीता राॅड्रिग्ज आणि दीपाली परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दीपाली परबचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ती फरार झाली आहे. तिच्याविरोधात ईओसीने ‘लूक आऊट’ जारी केले आहे. याशिवाय ईओसीने सुनीता राॅड्रिग्जसह आयडीलीक कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम पिरीस, विजय जाॅयल, नवनिक परेरा आणि सुशांत घोडगे यांच्याविरोधातही ‘लूक आऊट’ जारी केले आहे. संशयित विदेशात पळून जाऊ नयेत म्हणून ‘लूक आऊट’ जारी केल्याची माहिती ईओसीने दिली आहे.
सुनीताला आज चौकशीसाठी नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हा विभागाने मायरनची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज हिला चौकशीसाठी शनिवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या संदर्भात तिला शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे.