नादोडा-रेवोडा, बार्देश येथील एका महिलेच्या पतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष देत उमा पाटील हिने तब्बल ४ लाखांचा गंडा घातला होता.
म्हापसा: सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या महाठगांच्या कारनाम्यांनी गेल्या महिनाभरात गोव्याच्या जनतेला, पोलीस प्रशासनाला तसेच नेत्यांनाही डोक्याला हात लावला होता. या काळात अनेक प्रकरणे बाहेर आली. या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी सामान्य जनतेत किती क्रेझ आहे हे देखील स्पष्ट झाले. दरम्यान अनेक महाठगांना अटक झाली असून काहींना जामीन देखील मिळाला आहे. याच अनुषंगाने आज कोलवाळ येथील एक प्रकरणात एका महिलेस अटक करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार, आधीच एका फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या उमा पाटील (रा. बायणा वास्को) हिच्या विरोधात आणखी एक गुन्हा गोवा पोलिसांनी नोंदवला होता. दरम्यान आज पोलिसांनी तिला अटक केली. नादोडा-रेवोडा, बार्देश येथील एका महिलेच्या पतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष देत उमा पाटील हिने तब्बल ४ लाखांचा गंडा घातला होता.
याप्रकरणी उज्वला सिध्देश परब (रा. नादोडा-रेवोडा, बार्देश) यांनी कोलवाळ पोलिसांत गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. हा फसवणूकीचा प्रकार गेल्या ऑगस्ट २०२४ मध्ये घडल्याची माहिती तक्रारीत आहे. संशयित आरोपी उमा पाटील हिने फिर्यादीला तिच्या पतीला कोणत्याही सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी तिने ४ लाख रूपये रोख रक्कम घेतली.
मात्र, दोन महीने उलटले तरी उमा पाटीलने नोकरी मिळवून दिली नाही तसेच पैसेही परत केले नाही. दरम्यान उमा पाटील हिला अटक झाल्याची माहिती मिळतात परब दाम्पत्याच्या पायांखालून वाळूच सरकली. दरम्यान आपलीही फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच फिर्यादी महिलेने कोलवाळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेविरूध्द भारतीय दंड संहितेच्या ४२० कलमान्वये फसवणूकीचा गुन्हा नोंद केला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मुलाला सरकारी नोकरी देण्याचे भासवून चिंबल येथील एका महिलेकडून ६ लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित उमा पाटील व शिवम पाटील या मायलेकाला वास्को पोलिसांनी मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सध्या दोघेही संशयित आरोपी पोलीस कोठडीत आहेत.