३४.०२६ ग्रॅम सोने तसेच ३ लाख रुपये रोकड जप्त
कारवार : फक्त एका रॉडच्या सहाय्याने दिवसाढवळ्या १२८ घरे लुटणाऱ्या आंतरराज्य चोराला कारवार शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३४.०२६ ग्रॅम सोने तसेच ३ लाख रुपये रोकड जप्त केली आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाबसह गोव्यात ३ पोलीस स्थानकात त्याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत.
मूळ पंजाबच्या जालंधर येथील व सध्या होन्नावर येथील दुर्गाकेरी येथे वास्तव्यास असलेल्या सुमीर सतपाल शर्मा (वय ४०) याला अटक करण्यात आली आहे. तो गोवा, कर्नाटक, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह चार राज्यांत दिवसाढवळ्या घरफोड्या करत होता. या प्रकरणी पोलिसांना एक सुगावा लागल्यावर त्यांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवले.
कारवार येथील आश्रम रोडवरील अभिमानश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी फ्लॅट मालक प्रिया अँथोनी फर्नांडिस यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला होता. अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या मदतीने आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार करुन शोधमोहीम सुरू केली.
कारवार नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हुगार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बिरादार, कर्मचारी सूरज कोठारकर, हसन कुट्टी, गिरीशैया एम. एस. यांच्या पथकाने सुमीर शर्मा याला पंजाबमधील अमृतसर येथील गोल्डन मंदिराजवळ अटक केली. त्याच्याकडून ३४.०२६ ग्रॅम सोने तसेच ३ लाख रोकड असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवार पोलीस अधीक्षक एम. नारायण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सी. टी. जयकुमार आणि जगदीश एम, डीएसपी एस. व्ही गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटकसह गोवा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये गुन्हे दाखल
सुमीर याच्यावर कर्नाटकातील ११ पोलीस स्थानकात १०६ प्रकरणे, गोव्यात ३ पोलीस स्थानकात ७ गुन्हे, उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातील ४ पोलीस ठाण्यात ११ गुन्हे आणि पंजाबातील २ पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी एकूण १२८ प्रकरणे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत.
अजामीनपात्र वॉरंटची ३७ प्रकरणे प्रलंबित
अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा फरार असल्याने व न्यायालयात हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध विविध न्यायालयात प्रोक्लेमेशन वॉरंटची एकूण ३४ प्रकरणे आणि अजामीनपात्र वॉरंटची ३७ प्रकरणे प्रलंबित आहेत.