हणजूण पोलिसांनी चोरांकडून जप्त केलेल्या वस्तू.
म्हापसा : गाववाडी-हणजूण येथे घरफोडी करून शिमोगा-कर्नाटकमध्ये पलायन करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोळे-काणकोणमध्ये पोलिसांनी अटक केली व ११ मोबाईल आणि १ मॅक लॅपटॉप जप्त केला. कुमार कृष्णाप्पा दोड्डेरी (२०) व संदीप एन. (३०) अशी या संशयितांची नावे असून ते शिमोगातील रहिवाशी आहेत.
ही चोरीची घटना दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.५० ते १० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी विकास खडव (रा. राजस्थान) यांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हे भाड्याच्या घरातून बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि आतील दोन मोबाईल व एक मॅकबुक लॅपटॉप मिळून एकूण २.३५ लाख रुपये लंपास केले. पोलिसांनी सीटीटिव्ही फुटेजची पडताळणी केली असता ही चोरी चोघा चोरट्यांनी केल्याचे उघड झाले होते. संशयित आरोपी काणकोण मार्गे कर्नाटकमध्ये पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
त्यानुसार हणजूण पोलिसांनी काणकोण पोलिसांच्या मदतीने पोळे येथे त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर संशियतांना पोलिसांनी रितसर अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून वरील वस्तूंंसह अजून ९ मोबाईल फोन हस्तगत केले. या वस्तूंची किंमत ४ लाख रुपये आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहील वारंग करीत आहेत.