नागवात कारच्या धडकेत वीज खांब मोडला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th November, 11:43 pm
नागवात कारच्या धडकेत वीज खांब मोडला

म्हापसा : नागवा येथे वीज उपकेंद्राजवळ कारची धडक बसून वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले. हे ठिकाण अपघात प्रवण बनल्यामुळे गतिरोधक उभारण्याबाबत हडफडे-नागवा पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवला होता. याची कार्यवाही झाली नसल्याने हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे.

ही घटना सोमवार, दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले व कारने वीज ट्रान्सफॉर्मर असलेल्या खांबाला धडक दिली. कारच्या धडकेने हा वीज खांब मीटर बॉक्ससह तुटला गेला. ट्रान्सफॉर्मरला यामुळे धोका निर्माण झाला.

सकाळी वीज खात्याने हा मोडलेला वीज खांब दुरुस्तीचे काम हाती घेतले. संध्याकाळी उशीरापर्यंत हे काम सुरू असल्याने दिवसभर डायसवाडा तसेच आजूबाजूच्या वाड्यावरील लोकांचे विजेअभावी हाल झाले.

दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी वीज केबलच्या रीळला कारची धडक बसली होती. शिवाय या जागी रस्त्यावर लहानसे वळण आहे. या वळणाचा अंदाज वाहनस्वारांना येत नसल्याने येथे वारंवार अपघात घडतात.

जून २०२४ मध्ये झालेल्या हडफडे-नागवा पंचायत मंडळाच्या बैठकीत अपघातांची दखल घेऊन सदर ठिकाणी गतिरोधक उभारण्याचा ठराव घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव जुलै २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पंचायतीने पाठवला होता. तातडीने संबंधित खात्यांमार्फत गतीरोधक उभारण्याची विनंती केली होती. परंतु अद्याप याची कार्यवाही झालेली नाही.

नागवा वीज उपकेंद्राजवळ वारंवार अपघात घडत आहेत. यामुळे या ठिकाणी गतिरोधकाची गरज असल्यामुळे आम्ही ठराव घेत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. हा गतिरोधक उभारल्यावर होणारे अपघात नियंत्रणात येतील, अशी आशा असल्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले.