एअरसेलचे माजी मालक आनंद कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो याने जवळपास ५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ४०,००० कोटी रुपये) संपत्तीकडे पाठ फिरवली असून, त्याने बौद्ध भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला आहे.
क्वालालांपूर : मलेशियास्थित भारतीय वंशाचे दूरसंचार टायकून आणि अब्जाधीश आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो याने आपली विलासी आणि संपन्न जीवनशैली सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांनी सुमारे ५ अब्ज डॉलर्स (सुमारे ४०००० कोटी रुपये) च्या मालमत्तेकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्या या निर्णयाने जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. सिरीपान्यो याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी संन्यासाचा मार्ग निवडला आणि आज तो एक संन्यासी म्हणून आपले जीवन व्यतीत करत आहे.
आनंद कृष्णन हे मलेशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. ते दूरसंचार, मीडिया, रिअल इस्टेट, तेल आणि वायू यांसारख्या उद्योगातील मोठी आसामी आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५ अब्ज डॉलर्स (रु. ४० हजार कोटी) आहे. कोण्या एकेकाळी आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा प्रायोजक असणारा एअरसेल पुढे भारतात वाढणाऱ्या टेलिकॉम व्यवसायातील स्पर्धेमुळे डबघाईला आला. मात्र आनंद कृष्णन हे केवळ एक यशस्वी व्यापारीच नाहीत तर ते बौद्ध धर्माचे अनुयायी असून त्यांनी बौद्ध धर्माची तत्वे आपल्या जीवनात खोलवर रुजवलेली आहेत.
सिरीपान्यो याने वडिलांकडून अध्यात्माचे बाळकडू घेतले व आता एक पाऊल पुढे टाकून बौद्ध धर्माची दीक्षाच घेतली. उद्योगपती आनंद कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो याने आपल्या वडिलांची आध्यात्मिक आवड आपल्या जीवनात खोलवर अंतर्भूत केली. वेन अजान सिरीपान्यो याचे बालपण अगदी राजेशाही थाटात गेले. आपल्या दोन बहिणींसोबत लंडनमध्ये शिकत असताना त्याने विविध संस्कृती जवळून जाणून घेतल्या. त्याला इंग्रजी, तामिळ आणि थाई यासारख्या आठ भाषांचे ज्ञान आहे.
दरम्यान सिरीपान्योचा आध्यात्मिक प्रवास थायलंडच्या सहलीपासून सुरू झाला. तो आपल्या आजोळी आज्जी आजोबांना भेटायला गेला तेव्हा त्याला एका आश्रमात येथील साध्या सहज पण एका अभूतपूर्व जीवनशैलीचा विलक्षण अनुभव आला. या अनुभवाच्या प्रभावामुळेच सिरीपान्यो याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सिरीपान्योने वयाच्या १८ व्या वर्षी आपली कौटुंबिक संपत्ती आणि विलासी जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
सिरीपान्योचे वडील आनंद कृष्णन यांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. आपले आध्यात्मिक जीवन अधिक आरामदायी करण्यासाठी त्याने पेनांग हिलमध्ये एक आध्यात्मिक रीट्रीटचे देखील निर्माण केले आहे. आध्यात्मिक रीट्रीटमुळे सिरिपॅन्योला ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी शांततापूर्ण ठिकाण उपलब्ध झाले आहे. आत्म्याची शांती आणि आंतरिक समतोल साधण्यासाठी त्याग आणि अध्यात्माचे महत्त्व किती मोठे आहे हे त्याने दाखवून दिले. ४०,००० कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग करून सिरीपान्योने निवडलेला मार्ग आपल्याला विचार करायला भाग पाडतो. खरा आनंद केवळ बाह्य भौतिक संपत्तीमध्ये नाही तर आध्यात्मिक शांती आणि साध्या जीवनात आहे हा संदेश त्याने जगाला दिला आहे.
जरी सिरीपान्यो साधे जीवन जगत असला तरी त्याने आपल्या कुटुंबाशी संपर्क तोडलेला नाही. तो वेळोवेळी त्याच्या वडिलांना आणि कुटुंबाला भेटतो. तो एकदा इटलीमध्ये आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी खाजगी जेटने प्रवास करताना दिसला होता.