लोथल : गुजरातमधील हडप्पा संस्कृतीचे केंद्र असलेल्या लोथलमध्ये बुधवारी सकाळी पुरातत्व सर्वेक्षण ऑफ इंडियाच्या (एएसआय) दोन महिला अधिकारी मातीच्या ढिगाऱ्यामुळे गाडल्या गेल्या. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. आयआयटी दिल्लीतील त्यांच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून या दोन महिला गेल्या तीन दिवसांपासून लोथल येथील पुरातत्व स्थळाच्या हद्दीत भूवैज्ञानिक नमुने गोळा करत होत्या.
आयआयटी दिल्लीतील वायुमंडलीय विज्ञानाच्या सहायक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेले यमा दीक्षित आणि सुरभी वर्मा एका संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून भूवैज्ञानिक नमुने गोळा करण्यासाठी लोथल येथे आल्या होत्या. दोघीही तीन दिवसांपासून येथील विविध भागातून नमुने गोळा करत होत्या. दरम्यान, आज सकाळी १२ फूट खोल खड्ड्यातून नमुने गोळा करत असताना दरड कोसळून त्या दोघी गाडल्या गेल्या यात सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, लोथलच्या या वारसास्थळावर माती कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला प्रथम मिळाली . यानंतर अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू झाले. दोघींना तात्काळ खड्ड्यातून बाहेर काढून सीएचसी बगोद्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. सुरभी वर्माचे शवविच्छेदन करण्यात आले असून यमा दीक्षितवर उपचार सुरू आहेत.
लोथल हे सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. लोथल हे अहमदाबाद जिल्ह्याच्या ढोलका तालुक्यातील सरगवाला गावाच्या सीमेवर भोगावो आणि साबरमती नद्यांच्या दरम्यान अहमदाबादपासून ८० किमी अंतरावर वसलेले आहे. एकेकाळी या ठिकाणापासून समुद्र ५ किमी अंतरावर होता. हे अंतर १८ किमी झाले आहे. नोव्हेंबर १९५४ मध्ये या जागेचा शोध लागला आणि डॉ. एसआर राव यांच्या मार्गदर्शनाखाली १९५५ ते १९६२ पर्यंत उत्खनन करण्यात आले. येथील ओव्हल माऊंडचा घेर २ किमी आणि उंची ३.५ मीटर आहे.