कर्मचारी भरती आयोगाकडून सर्व खात्यांना आदेश
पणजी : अनुकंपा, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या कोट्यातील जागा वगळून अन्य रिक्त जागांची माहितीच खात्यांनी कर्मचारी भरती आयोगाला कळवावी, असा आदेश आयोगाने जारी केला आहे. याबाबत कर्मचारी भरती आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.
तसेच भरती नियम ४(२) नुसार खातेप्रमुखांनी १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या काळात फॉर्म १ व फॉर्म २च्या स्वरूपात रिक्त जागांची माहिती ऑनलाईन स्वरूपात कळवावी. संकेतस्थळावर फॉर्म १ व फॉर्म २ ऑनलाईन स्वरूपात पाठविण्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच खात्यांनी यापूर्वी कळवलेल्या रिक्त पदांची माहिती २०२५मध्ये पुन्हा कळवण्याची गरज नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. कर्मचारी भरती आयोगाने एलडीसी व ज्युनियर स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी जाहीरात दिली आहे. या दोन्ही पदांसाठीचा अभ्यासक्रमही जारी करण्यात आला आहे.
एलडीसी व ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी प्रत्येकी ६० गुणांचे सीबीटी - २ व सीबीटी - ३ असे दोन पेपर असतील. प्रत्येकी पेपरसाठी ७५ मिनिटांचा वेळ असेल.तसेच एलडीसीसाठी संगणकाच्या ज्ञानासह इंग्रजीमधून टायपिंगची ३० शब्द प्रती मिनीट अशी गती आवश्यक आहे. तसेच ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी शॉर्टहँडची प्रती मिनिट १०० शब्द व टायपिंगसाठी ३५ शब्द प्रती मिनिट अशी गती असणे आवश्यक आहे.