ग्रामस्थांची मागणी : स्थानिकांची कामे करण्यात सरपंच अपयशी
फोंडा येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना हेमंत सामंत व इतर.
फोंडा : बेतोडा पंचायतीचे सरपंच मधू खांडेपारकर यांनी काही दिवसांपूर्वी उच्चारी गावडे या युवकाला जातीवाचक शब्द उच्चारल्याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कामे घेऊन कार्यालयात येणाऱ्या लोकांना सरपंचांकडून चांगली वागणूक मिळत नाही. तसेच लोकांची कामे करण्यात सरपंच पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सरपंच मधू खांडेपारकर यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देण्याची मागणी बेतोडा पंचायतीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेत हेमंत सामंत, देवेंद्र च्यारी, इनासीना आझावेदो, सदानंद गावडे व हनुमंत गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रथम नागरिक म्हणून पंचायत क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान देण्यात सरपंच मधू खांडेपारकर अपयशी ठरत आहेत. दत्तगड येथे ९५ टक्के काम पूर्ण झालेल्या कचरा प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यात सरपंचांना यश आले नाही. सरपंच पदाच्या कारकिर्दीत गेले वर्षभर हा प्रकल्प रखडलेला आहे. पदाला न्याय देण्यासाठी सरपंच मधू खांडेपारकर यांनी स्वतःहून पायउतार होण्याची गरज असल्याचे हेमंत सामंत यांनी सांगितले.
सरपंच मधू खांडेपारकर यांच्याविरुद्ध नाराजी पसरत आहे. लोकांच्या समस्या सोडविण्याऐवजी सरपंच दुसऱ्या प्रभागात फिरत असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या सरपंचांच्या कारकिर्दीत रोखून ठेवलेले ना हरकत दाखले विद्यमान सरपंच बिनधास्त देत आहेत. लोकांना विश्वासात न घेता स्वतः निर्णय घेत असून त्यांनी लोकांच्या हितासाठी पदाचा राजीनामा देणे गरजेचे अाहे. _ सदानंद गावडे, ग्रामस्थ