भारतीय कुस्तीपटूला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात.
नवी दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. बजरंग पुनियाने मार्चमध्ये डोप चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता. यानंतर नाडाने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. नाडाच्या कलम १०.३.१ चे उल्लंघन केल्याने पुनियावर बंदी लादण्यात येत असल्याचे पॅनेलचे म्हणणे आहे.
नाडा ने २३ एप्रिल रोजी डोप चाचणीसाठी नमुने देण्यास नकार दिल्याने टोकियो गेम्सच्या कांस्यपदक विजेत्या बजरंगला प्रथम तात्पुरते निलंबित केले होते. तात्पुरत्या निलंबनाविरोधात बजरंगने अपील केले होते. यानंतर, नाडाच्या अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलने ३१ मे रोजी नाडाकडून नोटीस जारी होईपर्यंत हे निलंबन रद्द केले. यानंतर नाडाने बजरंग पुनियाला २३ जून रोजी पुन्हा याबाबत नोटीसही पाठवली होती. यानंतर यूडब्लूडब्लूने त्याच्या निलंबनावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान या कारवाईला बजरंगने ११ जुलै रोजी लेखी आव्हान दिले होते. या प्रकरणी २० सप्टेंबर आणि ०४ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.
एडीडीपीनुसार, बजरंग नाडाच्या १०.३.१ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाला असून त्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. नाडाच्या या कारवाईमुळे बजरंग पुनिया यापुढे स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन करू शकणार नाही. याशिवाय बजरंग पुनिया देशात तसेच परदेशातही कोचिंगच्या नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही. निलंबनाची ही अधिसूचना यावर्षी २३ एप्रिल रोजी बजरंगला पाठवण्यात आली होती. त्याच तारखेपासून निलंबनाचा अवधी सुरू होईल.
दरम्यान, बजरंगने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश केला होता. त्याच्यासोबत कुस्तीपटू विनेश फोगटनेही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. विनेश फोगटने जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिने भाजप उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. आता विनेश फोगट आमदार आहे. दरम्यान सध्या काँग्रेसच्या वतीने बजरंग पुनिया यांना काँग्रेस शेतकरी कार्यकारिणीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.