अंतिम फेरीत चीनचा १-० ने केला पराभव : दीपिकाचा निर्णायक गोल
राजगीर : भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले. बुधवारी बिहार येथील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा १-० ने पराभव केला.भारतीय संघाने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. भारताने यापूर्वी २०१६ आणि २०२३ मध्ये महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने चषकावर आपले नाव कोरले आहे. भारताशिवाय दक्षिण कोरियानेही ही ट्रॉफी तीनदा जिंकली आहे.
अंतिम सामन्यात भारतासाठी एकमेव गोल दीपिकाने ३१ व्या मिनिटाला केला.भारतीय संघ आणि चीन महिला संघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघाकडून एकही गोल झाला नाही. हाफ टाइमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली. या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे दीपिकाने गोलमध्ये रूपांतर केले. यासह भारतीय संघ १-० ने पुढे गेला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एकही गोल झाला नाही. चौथ्या म्हणजे शेवटच्या सत्रात चीनने अधिक दृढनिश्चय दाखवला. मात्र, भारताने त्वरीत नियंत्रण मिळवले आणि दोन मिनिटांत पेनल्टी कॉर्नर मिळवला. पण त्याचे रूपांतर करता आले नाही. त्यानंतर चीनने पकड घेण्याचे प्रयत्न वाढवले, परंतु भारतीय संरक्षण अभेद्य राहिले आणि चीनच्या हल्ल्याचे सर्व मार्ग प्रभावीपणे बंद केले. अखेरीस, भारतीय संघाने तिसरे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद १-० ने जिंकले.
हॉकी इंडियाकडून बक्षीस जाहीर
महिला आशियाई चॅम्पियन्स चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला हॉकी इंडियाने ३ लाख रुपये आणि सर्व सपोर्ट स्टाफला १.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विजेत्या भारतीय संघाला १० हजार अमेरिकन डॉलर, तर चीन आणि जपानला अनुक्रमे ७ हजार आणि ५ हजार अमेरिकन डॉलर देण्यात आले.
बिहार सरकारकडून प्रत्येक खेळाडूला १० लाख
भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला बिहार सरकारकडून १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारताने अंतिम फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा १-० असा पराभव केला.मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफलाही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना १० लाख रुपये तर उर्वरित सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जातील.बऱ्याच वर्षांनंतर बिहारमध्ये उच्चस्तरीय हॉकी सामने खेळवले गेले आणि भारतीय महिला संघाचे सर्व सामने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये झाले.