भारतीय संघाचे ४ खेळाडू दुखापतग्रस्त

बॉर्डर-गावसकर चषकापूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th November, 12:34 am
भारतीय संघाचे ४ खेळाडू दुखापतग्रस्त

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावकर ट्रॉफी स्पर्धेची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय ताफ्यातील खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बाॅर्डर-गावसकर मालिकेआधीच भारतीय संघाचे ४ खेळाडू हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींचे टेन्शन वाढले आहे. सर्फराज खान, विराट कोहली आणि केएल राहुल यांना काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यानंतर शनिवारी (१६ नोव्हेंबर) शुभमन गिलदेखील क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्ररक्षण करताना गिलच्या बोटाला दुखापत झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२०२५ मध्ये भारतीय संघ सध्या दुसर्‍या स्थानावर आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हाईट वॉश मिळाला होता. अशामध्ये भारतीय संघाला या पराभवामुळे मोठा फटका बसला होता. अशामध्ये सध्या डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानवर असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणे अनिवार्य आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट एसोसिएशन ग्राउंडवर इंट्रा-स्क्वाड मॅच सिम्युलेशनच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिलच्या बोटाला दुखापत झाली. पण, संघ व्यवस्थापन काही दिवस त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार आहे. त्यानंतर त्याच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी केएल राहुल २९ धावांवर असताना वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या कोपराला लागला. तर विराट कोहली आणि सर्फराज खान हेदेखील दुखापतग्रस्त झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआय २२ नोव्हेंबर पासून रंगणाऱ्या पर्थ कसोटी सामन्याआधी एक मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. भारत ‘अ’ संघातील दोन युवा खेळाडूंना टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री मिळू शकते.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पोहचण्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत ‘अ’ संघ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ यांच्यात दोन सामन्यांची अनौपचारिक कसोटी सामने खेळवण्यात आले होते. या ताफ्यातील देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन या दोघांना टीम इंडियासोबत ठेवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थान घेऊ शकते.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या पर्थ कसोटी सामन्याआधी भारतीय संघ आणि भारत ‘अ’ यांच्यात प्रॅक्टिस मॅच खेळवण्यात येत आहे. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल भारत ‘अ’ संघाचा भाग आहेत. मॅच प्रक्टिस दरम्यान भारतीय ताफ्यातील काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. विराट कोहली, सर्फराज खान शंभर टक्के फिट नाहीत, अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर या यादीत लोकेश राहुलसह शुबमन गिलचेही नाव आहे.
सराव सामन्यात लोकेस राहुल हा बॅटिंग करताना दुखापतग्रस्त झाला होता. शुबमन गिल याला फिल्डिंग वेळी हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तो पहिल्या कसोटीला मुकणार असल्याचेही बोलले जात आहे. ताफ्यातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन बॅकअप खेळाडूंच्या रुपात भारत ‘अ’ संघातील खेळाडूंना संघासोबत थांबवण्याच्या विचारात आहे. ज्यात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांची नावे आघाडीवर आहेत. वेळ प्रसंगी या खेळाडूंना टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळू शकते.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी मालिका महत्त्वाची
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने खूपच महत्त्वाची झाली आहे. भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकायची आहे. जर निकाल यापेक्षा वेगळा लागला तर टीम इंडियाला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.