न्युयॉर्क : न्यू यॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टचे यूएस ऍटर्नी ब्रायन पीस यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर सौर ऊर्जेशी संबंधित करारासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे २११० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. आरोपांनुसार, ही लाच २०२० ते २०२४ दरम्यान एका मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी देण्यात आली होती. अहवालात सादर केलेल्या आकडेवारीनुसार अदानी समूहाला या प्रकल्पातून सुमारे २ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती.
न्यू यॉर्कच्या न्यायालयाने उद्योगपती अदानी, त्यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन यांच्यावर कंत्राट मिळवण्यासाठी सिक्युरिटीज फ्रॉड, वायर्ड फ्रॉडद्वारे येथील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच दिली. यामुळे कंत्राट प्रक्रियेत सहभागी झालेल्या इतर कंपन्यांवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. या एकूणच घटनेमुळे अदानी समूहाचा अवघ्या काही क्षणात तब्बल २.२४ लाख कोटींचा तोटा झाला.
तसेच भारतीय शेअर्स बाजारात देखील उदासीनता पसरली असून गुंतवणूकदारांनाही जबर नुकसान सोसावे लागले आहे. अदानी ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्यांना सर्वात जास्त तोटा सहन करावा लागला आहे. एकीकडे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाच्या आगळिकीने जगावर युद्धाचे सावट पसरल्यामुळे भारतीय शेअर्स बाजाराने लोटांगण घातलेले असतानाच, अदानी वरील या नव्या आरोपांमुळे त्याला आता खिंडारच पाडले आहे.
गेल्याच वर्षी २४ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या धक्कादायक अहवालाने अदानी समूहाचे प्रचंड नुकसान केले होते. मागे जुलैमध्ये पुन्हा हिंडनबर्गने भारतीय शेअर्स बाजार नियामक सेबी आणि अदानी समूहाचे साटेलोटे असल्याचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी तसेच सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अधिकृत निवेदन जारी करत सदर प्रकार म्हणजे भारताचे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याचे म्हणत एकूणच आरोपांचे खंडन केले होते.
दरम्यान नव्या अहवालामुळे पुन्हा अदानी समूहाच्या तसेच भारतीय शेअर्स बाजार नियामक सेबीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान शेअर्स बाजारातील अनेक तज्ञांनुसार अदानी समूहाला यावेळी गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी विशेष पावले उचलावी लागतील. कालच महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. दरम्यान दोन्ही राज्यांत अदानी समूहाने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मुंबईत तर अदानी समूह धारावी झोपडपट्टी पुनर्निर्माण प्रकल्पावर काम करत आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ' मोदी जी तुम्ही नेहमीच 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' म्हणता. मग अदानी यांना लाचखोरीच्या आरोपांखाली अजूनही अटक का केली जात नाही' असा प्रश्न आजच घेतलेल्या एका सभेतून विचारला आहे. तर कालच महाराष्ट्रातून समोर आलेल्या बिटकोईन घोटाळ्याबाबत भाजप 'इंडि आघाडी'ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.