केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत राज्याला कर्ज निधी मंजूर
पणजी : केंद्र सरकारने पर्यटन विकास योजनअंतर्गत राज्य सरकारला १८८.२१ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. यातील ९७.४७ कोटी रुपये खर्चून फोंडा येथे छ. शिवाजी महाराजांवर आधारित डिजिटल संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पर्वरी येथे ‘टाऊन स्क्वेअर’ प्रकल्पासाठी ९०.७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतून देशातील ४० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.
डिजिटल संग्रहालय फार्मागुढी येथील किल्ल्याजवळ उभारले जाणार आहे. पीपीपी तत्त्वावरील या प्रकल्पात किल्ल्याचे नूतनीकरणही होणार आहे. संग्रहालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानान वापरलेले परस्परसंवादी प्रदर्शन असेल. येथील अभिनव कथाकथन तंत्राने छ. शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांचे साक्षीदार होता येणार आहे. मराठा साम्राज्याची भव्यताही अनुभवता येणार आहे.
पर्वरी येथील ‘टाऊन स्क्वेअर’मध्ये पार्किंग सुविधा, वॉचटॉवर, संगीत कारंजे असतील. यामध्ये सांस्कृतिक कार्यशाळा, परफॉर्मन्स आणि गोव्याचे संगीत, नृत्य, कला आणि पाककृती दर्शविणारी प्रदर्शने यांचा समावेश राहील. परस्परसंवादी अनुभव आणि कार्यक्रमांचे एकत्रीकरण पर्यटकांना संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव प्रदान करेल.
विविध राज्यांच्या ८७ पैकी ४० प्रस्तावांना मंजुरी
देशाचा विचार करता केंद्र सरकारने ४० पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३ हजार २९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतून फारशी प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल. योजना आखण्यापूर्वी सर्व राज्य सरकारांशी चर्चा केली होती. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला विविध राज्यांकडून ८ हजार कोटी रुपयांचे ८७ प्रस्ताव आले होते. खात्याच्या नियमानुसार यातील ४० प्रस्ताव स्वीकारण्यात आले.