संशयित बार्देश तालुक्यातील असल्याची माहिती प्राप्त
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एस्कॉर्ट वेबसाईटवरुन वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सिंडीकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात चार संशयितांना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयाने गुन्हा शाखेने बार्देश तालुक्यातील तीन टॅक्सी चालकांची चौकशी सुरू केली आहे.
एस्कॉर्ट वेबसाईट बनवून वेश्या व्यवसाय करत गोव्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गोवा पोलिसांच्या सायबर विभागाच्या मदतीने गुन्हा शाखेने चौकशी सुरू केली. त्यानुसार, गुन्हा शाखेने आंध्र प्रदेशमधून सय्यद सुलतान उस्मान (५४) आणि मोहम्मद सलामतुल्लाह मोहेबुल्ला (३०) या दोघांना प्रथम अटक केली होती. त्या दोघांची चौकशी केली असता, यात अनेक जणांचा सहभाग असल्याचे समोर आले.
त्यानुसार, गुन्हा शाखेने अधिक चौकशी केली. त्यात ७८ एस्कॉर्ट वेबसाईटवरुन गोव्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्या गुन्हा शाखेने ब्लॉक केल्या. त्यानंतर गुन्हा शाखेने उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमध्ये धडक देत योगेश कुमार याला अटक केली. त्यानंतर सुभाष प्रधान (३२) याला अटक केली होती. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, यात टॅक्सी चालकांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा शाखेने बार्देश तालुक्यातील तीन टॅक्सी चालकांची चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर तसेच पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत पुढील तपास करत आहेत.