फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
म्हापसा: घाट्येश्वरनगर, खोर्ली येथील शिवा कुडणेकर यांच्या घराला आग लागून २ लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. कुडणेकर कुटूंबिय घर बंद करून जवळच असलेल्या नातेवाईकांच्या घरी हळदी समारंभाला गेले होते. त्यानंतर अचानक घराच्या पहिल्या मजल्याला आग लागली. फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घरातून धूर येत असल्याचे दिसून येताच कुडणेकर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली व दरवाजा उघडून शेजार्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही, उलट आग अजून भडकली.
घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीत फ्रीज, टिव्ही, कॉट व इतर घरगुती वस्तू जळून खाक झाल्याने अंदाजे २ लाखांचे नुकसान झाले.
अग्निशमन दलाचे हवालदार विष्णू गावस, योगेश आमोणकर, सनील बाणावलीकर, चंद्रकांत नाईक, प्रविण गावकर, गोविंद देसाई व अमोल सातार्डेकर या जवानांनी आग नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विराज फडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.