अपघातग्रस्त सातारा- महाराष्ट्रातील असल्याची माहिती; तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू
म्हापसा : करासवाडा, म्हापसा येथे महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने सातारा महाराष्ट्रातील ७ पर्यटक जखमी झाले. त्यातील गंभीर असलेल्या तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर घेऊन चालक पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
जखमीमध्ये गणपत कासित (४७), सचिन फाळके (४७), उदय भोसले (४५), प्रमोद झंजने (४७), धर्मेंद्र फाळके (४८), प्रमोद जाधव (४८) व शंकर आराटे (४७) यांचा समावेश आहे. यातील गणपत, सचिन व उदय हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत तर इतर किरकोळ जखमींना जिल्हा इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हा अपघात आज मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला. एमएच ०५ सीएम ४९१४ क्रमांकाच्या अर्टिगा कारने सदर पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत होते. ही कार करासवाडा म्हापसा येथे बांदेकर पेट्रोलपंपजवळ पोहचताच कार चालक शंकर आराटे यांना महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनर ट्रकचा अंदाज आला नाही व भरधाव कार या कंटेनरला मागून धडकली.
या अपघातात कारमधील सातही प्रवासी जखमी झाले. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कार मधून बाहेर काढले. मात्र कारच्या दर्शनी भागात अडकलेल्या दोघांना म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढत जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून गंभीर जखमी तिघांना गोमेकॉत हलवण्यात आले असून इतरांना डिस्चार्ज दिला.
अपघातानंतर त्या कंटेनरसह अज्ञात चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार नंदू कुडासकर यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला. पोलीस त्या कंटेनरसह चालकाचा शोध घेत आहेत.
दरम्यान घटनास्थळी महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने पार्क करून वाहन वाहतूकीला अडथळा ठरण्याच्या प्रकारावर गोवन वार्ताने यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून प्रकाश टाकला होता. त्यानंतर फक्त म्हापसा ते कोलवाळच्या बाजूच्या वाटेने नो पार्किंग फलक प्रशासनाने लावला आहे, तरीही या महामार्गावर वाहतूक पोलीस, वाहतूक खाते व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे वाहने पार्क केली जातात.